''हो परंतु ते वारले. मी हे यंत्र तेव्हा पाहत असे.''

''मला काही गवताचा व्यापार करण्याची इच्छा नाही. धान्याचा आहे तेवढा पुरे. पसारा मांडवा तेवढा थोडाच आहे.'' तो म्हणाला.

''तुम्ही एकटे आहात म्हणून असे म्हणता. उद्या लग्न करा, संसार मांडा. मग सारे त्रिभुवन कमी वाटेल.'' एक व्यापारी म्हणाला.

हेमंत हसला. काही न बोलता तो निघाला. सुलभाही निघाली.

''तुम्हांला कोठे जायचे?'' हेमंताने विचारले.

''मी इकडे अशीच जात होते.'' ती म्हणाली.

''तुम्ही या गावच्या नाही वाटते?''

''परंतु या गावच्या होण्यासाठी आले आहे. आज फारच उकाडा होत आहे.''

''माझे घर जवळ आहे. थंड पेय घेऊन जा.''

''नको, नको.''

''खरेच या; बरे वाटेल.'

शेवटी ती त्याच्याबरोबर गेली. एका नोकराने थंड सरबत आणले. हेमंतने एक पेला सुलभासमोर ठेवला.

''घ्या.''

''तुम्हीही घ्या.''

दोघांनी सरबत घेतले. हेमंतने पंखा समोर ठेवला. सुलभा वारा घेत होती. तेथील फुलदाणीतले एक फूल तिने सहज काढून घेतले.

''उशीर झाला. मी आता जाते. तुमचा परिचय झाला. आनंद झाला. तुमचे नाव ऐकत होते. हेमंत ऋतु म्हणजे प्रशांत ऋतु. तुम्ही शांत सुस्वभावी आहात. जाते मी.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel