''लोक वाटेल ते म्हणतात. स्वत:ला जोपर्यंत एखादा वाईट आहे असा अनुभव आला नाही. तोपर्यंत आपण स्वच्छ मत बनवू नये. आणि सुलभाताई, जगात निर्दोष असे कोणी आहे? प्रत्येकात काही चांगले, काही वाईट असते. कोणी कालपर्यंत चांगला असतो; उद्या वाईट होतो. कोणी कालपर्यंत वाईट असलेला उद्या चांगलाही होईल. आपल्या प्रेमाने दोषांवर पांघरूण घालावे. सार्‍या जगाने वाईट म्हटले तरी आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपण जवळ करावे, तरच प्रेमाला अर्थ. तरच ते प्रेम बळ देईल, श्रध्दा देईल, आशा देईल.''

''हेमा, तू म्हणतेस ते मला पटत असले तरी त्याप्रमाणे मी वागू शकेन, किंवा त्या मुलीच्या ठायी मी असते तर तू सांगतेस त्याप्रमाणे मी वागू शकले असते, असे मला वाटत नाही.''

''सुलभाताई, तुम्ही एकाएकी का असा प्रश्न केलात?''

''एका पुस्तकात होती अशी गोष्ट.''

''त्या लेखकाने कोणता निर्णय दिला आहे? त्या गोष्टीतील ती मुलगी कशा रीतीने वागली?''

''मला नाही आठवत. मी जरा पडते. तुझा रुमाल संपणार वाटते?''

''आज संपेल. मग दुसरा करायला घेईन. तुम्ही आहात तो शिकवा.''

''आहात तो म्हणजे?''

''उद्या कोठे गेलात तर मी पुन्हा एकटीच राहणार.''

''माझ्याबरोबर तूही ये.''

''तुम्ही पडा. आज तुम्ही खूप भटकून आलेल्या आहात. दमला असाल.''

सुलभा कुशीवर वळली. हेमा रुमाल करीत बसली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel