ऐकायला कदाचित हे थोडे विचित्र वाटेल, पण हे खरे आहे. झारखंड च्या रामगढ जिल्ह्यात असलेल्या झरना मंदिरात भगवान शंकराचा अभिषेक स्वतः गंगामाता करते.
हा अभिषेक आठवड्यातले सातही दिवस चोवीस तास चालू असतो. गंगामातेच्या मूर्तीमधून अखंड पाण्याची धारा वाहत असते जी सतत शंकराच्या पिंडीवर म्हणजेच शिवलिंगावर पडत राहते. हा पाण्याचा प्रवाह कुठून येतो, हे आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही.
इंग्रजांनी शोधले होते मंदिर
मंदिराचा इतिहास इंग्रजांशी जोडला गेलेला आहे. भारतातील ब्रिटीश राजवटीच्या काळात जेव्हा इंग्रज इथे रेल्वे लाईन बनवत होते, त्यावेळी पाण्यासाठी विहीर खोदत असताना या मंदिराचा शोध लागला. जमिनीच्या गर्भातच शिवलिंग होते, आणि सोबत गंगामातेची मूर्ती होती जिच्यामधून पाण्याची धारा निघत होती आणि थेट भगवान शंकरावर अभिषेक करत होती. पुढे शंकराच्या भक्तांनी इथे मंदिर बांधले.
हैंडपंपातून अपोआप पाणी येते
मंदिराच्या बाजूलाच २ हैंडपंप आहेत जे कधीच चालवावे लागत नाहीत. त्यांच्यामधून अखंड पाण्याची धारा वाहत राहते. अतिशय तीव्र, भीषण अशा उकाड्यातही हा पाण्याचा प्रवाह कधी कमी होत नाही. इथे येणारे भक्तगण हे याच पाण्याने भगवान शंकरांना अभिषेक करतात आणि आपल्या इच्छा - आकांक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून प्रार्थना करतात.