गुजरात मधील बोटाद शहराजवळ असलेल्या सारंगपूर येथील हनुमान मंदिर हे एक अद्वितीय, अद्भुत असे मंदिर आहे. इथे मारुतीरायांना नारळाचा प्रसाद चढवला जातो जो त्यांच्या मूर्तीच्या तोंडात ठेवला जातो. मूर्ती त्या नारळाचा अर्धा हिस्सा आपल्या हाताने भक्ताला परत देते आणि बाकीचा अर्धा नारळ मारुतीरायाना अर्पण होतो. मंदिरचे महंत श्री. लालभाई यांच्या म्हणण्यानुसार या मूर्तीला याच उद्देशाने तयार करण्यात आले आहे. मंदिर स्वच्छ राहावे या हेतूने असे करण्यात आले आहे. ते म्हणतात की मंदिरात नारळ फोडल्यामुळे सगळीकडे कचरा आणि ओल साठून राहते. त्यामुळे आम्ही अशा मूर्तीची निर्मिती आणि स्थापना केली की ज्यामुळे देवाला नैवेद्य आणि भक्ताला प्रसाद मिळेल आणि कचरा वगैरे देखील होणार नाही. त्यांनी सांगितले की प्रत्यक्षात मूर्तीच्या तोंडात एक मशीन बसवण्यात आले आहे जे नारळाचे २ तुकडे करते. मूर्तीच्या तोंडातून नारळ आत जातो आणि मशीनद्वारे २ भागात कापला जातो. त्यातील एक तुकडा मूर्तीच्या हातावाटे बाहेर येतो जो प्रसाद म्हणून भक्तांना देण्यात येतो, तर उरलेला अर्धा भाग मशीनमध्ये जातो जो मंदिर प्रशासन मोबदला म्हणून स्वीकारते.