मला वाटे, हे कावळ्यांना कसे सहन होते? त्यांना हे माहीत आहे का? आम्ही मानवप्राणी कावळ्यांना किती हीन मानतो हे त्यांना ठाऊक आहे का? जर ठाऊक असेल तर ठाऊक असूनही ते मानवांशी इतक्या चांगुलपणाने का राहतात? कधी मनुष्याजवळ भांडत नाहीत, त्याला सोडून जात नाहीत. आपण विचारावे कावळ्यांना, असे मी मनात ठरवले.
मला आपली चिमण्या, कावळे, गायी, मांजरे, कुत्री, मुंग्या, मैना, पोपट यांची भाषा समजे. त्यांची भाषा समजण्यास सोपी आहे. संदर्भाप्रमाणे त्यांच्या ध्वनींना वेगवेगळे अर्थ असतात. मी थोडेसे संस्कृत इंग्रजी शिकलो, परंतु मग कंटाळलो. किती तरी शब्द त्या भाषांत आणि शब्दाशब्दासाठी किती त्यांच्यात भांडणे! शब्दांचे अर्थही त्यांचे निश्चित नाहीत. एकाच पुस्तकाचे अनेक अर्थ ते करतात. ज्या पुस्तकांचा अर्थ निश्चित नाही, ज्या शब्दांचा अर्थ नक्की नाही असे शब्द कोणी लिहावे तरी का? त्या शब्दांचा उपयोग करुन कशाला रचावी पुस्तके? त्या शब्दांचे अर्थ ठरवण्यासाठी कोश काढतात! मला कंटाळा आला त्या मानवी शब्दांचा, त्या लठ्ठ लठ्ठ कोशांचा! ते लठ्ठ कोश उशाला घ्यायला बरे, असे वाटे. मी इतर भाषांचा अभ्यास करण्याचे सोडून दिले. सर्व मानवांना व्यापून राहाणारी, अश्रू व हास्य यांची भाषा मी नीट शिकून ठेवली, पण त्यांतही भानगडी! कधी कोणाचे म्हणे नक्राश्रू असतात, तर कधी दु:खाश्रू ! कधी अपमानामुळे आलेले अश्रू, कधी आनंदाश्रू ! कोणी आनंदाने हसे, तर कोणी थट्टा करण्यासाठी हसे, कोणी मिस्किलपणे हसे. साधे हसणे व रडणे, पण त्याचाही मानवी अर्थ निश्चित नाही.
मला आपली पाखरे आवडत, तृणे-फुले आवडत, गायी-बैल आवडत. त्यांच्याजवळ मी जायचा, बोलायचा, खेळायचा. त्यामुळे मला त्यांची भाषा समजू लागली. कावळ्यांचीही भाषा मला समजू लागली. त्यांची सुख-दु:खे मला समजत. त्यांच्या, ‘काऽका काऽका’ या आवाजातील आरोहावरोह मला ओळखता येत. एक दिवस एका कावळ्याजवळ मी सर्व चौकशी करायचे ठरवले. माणसाबद्दल त्याचे काय मत आहे, ते विचारून घ्यायचे मी ठरवले.