धर्म ग्रंथांनुसार भगवान विष्णूनी कूर्म (कासव) अवतार घेऊन समुद्र मंथनात सहाय्य केले होते. भगवान विष्णूंच्या कूर्म अवतरला कच्छप अवतार देखील म्हटले जाते. याची कथा अशा प्रकारे आहे – एकदा दुर्वास ऋषींनी देवांचा राजा इंद्र याला शाप देऊन श्रीहीन केले. इंद्र जेव्हा भगवान विष्णूंकडे गेला तेव्हा त्यांनी समुद्र मंथन करायला सांगितले. तेव्हा भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून देव आणि दैत्यांनी एकत्र मिळून समुद्र मंथन करण्याचे ठरवले. समुद्र मंथन करण्यासाठी मंदराचल पर्वताची रवी तर नागराज वासुकीला नेती बनवण्यात आले. दैत्य आणि देवतांनी आपल्यातले मतभेद विसरून मंदराचल उखडला आणि समुद्राकडे घेऊन चालले. परंतु ते पर्वताला जास्त अंतर नेऊ शकले नाहीत. तेव्हा मग भगवान विष्णूनी मंदराचल समुद्र तटावर ठेवला. देव आणि दैत्यांनी मंदराचल समुद्रात सोडून नागराज वासुकीला नेती बनवले. परंतु मंदराचलच्या खाली कोणताही आधार नसल्याने तो समुद्रात बुडू लागला. हे पाहून भगवान विष्णूनी विशाल कासवाचे रूप घेतले आणि समुद्रात जाऊन मंदराचल आपल्या पाठीवर घेऊन आधार दिला. भगवान कुर्माच्या विशाल पाठीवर मंदराचल सहजतेने फिरू लागला आणि अशा प्रकारे समुद्रमंथन संपन्न झाले.