धर्म ग्रंथांनुसार बौद्ध धर्माचा प्रवर्तक गौतम बुद्ध देखील भगवान विष्णूंचा अवतार होता, परंतु पुराणात भगवान बुद्धाचा जन्म गया जवळ कीकट इथे झाल्याचे वर्ण आहे आणि त्याच्या पित्याचे नाव अजन सांगितले आहे. हा प्रसंग पुराणात वर्णिलेल्या बुद्धावताराचा आहे.
एकदा दैत्यांची शक्ती खूप वाढली होती. देवता देखील त्यांना घाबरून पळू लागले. राज्याच्या अभिलाषेने दैत्यांनी देवराज इंद्राला विचारले की साम्राज्य स्थिर राहावे यासाठी उपाय कोणता आहे. तेव्हा इंद्राने शुद्ध अंतःकरणाने सांगितले की स्थिर साम्राज्यासाठी वेदविहित आचरण आणि यज्ञ आवश्यक आहेत. तेव्हा दैत्य वैदिक आचरण आणि यज्ञ करू लागले, ज्यामुळे त्यांची शक्ती आणखीनच वाढू लागली. तेव्हा सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले. तेव्हा भगवंतांनी देवांच्या हितासाठी बुद्ध रूप धारण केले. त्यांच्या हातात झाडू होती आणि ते मार्ग स्वच्छ करीत चालत असत.
अशा प्रकारे भगवान बुद्ध दैत्यांकडे गेले आणि त्यांना उपदेश केला की यज्ञ करणे पाप आहे. यज्ञाने जीवांची हिंसा होते. यज्ञाच्या अग्नीमुळे कित्येक जीव जाळून भस्म होतात. त्यांच्या उपदेशाने दैत्य प्रभावित झाले. त्यांनी यज्ञ आणि वैदिक आचरण करणे सोडून दिले. त्यामुळे त्यांची शक्ती कमी झाली आणि देवतांनी त्यांच्यावर हल्ला करून आपले राज्य पुन्हा मिळवले.