धृतराष्ट्राचा विवाह गांधार देशाची राजकुमारी गांधारी हिच्याशी झाला होता. गांधारीच्या कुंडलीत दोष असल्याने एका साधूच्या सांगण्यानुसार आधी तिचा विवाह एका बकऱ्याबरोबर लावण्यात आला. नंतर त्या बकऱ्याचा बळी दिला गेला. ही गोष्ट गांधारीच्या विवाहाच्या वेळी लपवून ठेवण्यात आली होती. जेव्हा धृतराष्ट्राला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने गांधार नरेश सुबाला आणि त्याच्या १०० पुत्रांना कारावासात टाकले आणि त्यांचा छळ केला. एक एक करून सुबाला चे सर्व पुत्र मारू लागले. त्यांना खाण्यासाठी फक्त मूठभर भात दिला जायचा. सुबालाने आपला सर्वात छोटा मुलगा शकुनी याला सूड घेण्यासाठी तयार केले. सार्वजण आपल्या हिश्शाचा भात शकुनीला देत असत जेणे करून तो जिवंत राहील आणि कौरवांचा नाश करेल. मृत्युपूर्वी सुबालाने धृतराष्ट्राला विनंती केली की शकुनीला सोडावे. धृतराष्ट्राने ही विनंती मान्य केली. सुबालाने शकुनीला आपल्या मणक्याच्या हाडांपासून फासे तयार करण्यास सांगितले, हेच फासे कौरवांच्या विनाशाला कारणीभूत ठरले. शकुनीने हस्तिनापुरात सगळ्यांचा विश्वास संपादन केला आणि १०० कौरवांचा मार्गदर्शक सल्लागार बनला. त्याने दुर्योधनाला युधिष्ठिराच्या विरुद्ध भडकावले आणि महाभारताच्या युद्धाचा आधार बनवला.