कौशल्य कसचे ?' मिरी म्हणाली.

'हं, वाच. विनय पुरे.' ते म्हणाले.

मिरीने ती कविता किती सुंदर रीतीने वाचून दाखविली. आवाज मृदू होई. गंभीर होई. कवीच्या भावनांशी ती एकरूप होई. सारी मंडळी स्तब्ध होती.

'सुंदर' कृष्णचंद्र म्हणाले.

हळूहळू त्या घरात लडी, मडी यांचा तोरा कमी होऊ लागला. त्या लवकरच आपल्या घरी जायची तयारी करू लागल्या. सुमित्रा, मिरी हवापालट करायला जाण्यापूर्वीच त्या जाऊ म्हणू लागल्या. प्रेमा राहणार होती. एके दिवशी लडी नि मडी निघून गेल्या. जाताना मिरीशी बोलल्याही नाहीत. मिरीने त्यांना दोन फुले नेऊन दिली. त्यांनी हातात घेऊन ती कोपर्‍यात फेकली. प्रेमाने ती उचलून स्वत:च्या केसात घातली.

'प्रेमा तुझ्या डोक्यात ही फुले कोठून आली ?' मिरीने विचारले.

'मडी नि लडीला तू दिलीस ना, तीच ही. त्यांनी ती फेकून दिली. मी ती उचलून घेतली. प्रेमाने दिलेल्या वस्तूचा असा अव्हेर होऊ नये.'

'मी तरी प्रेमाने दिली होती का ? प्रेमा, केवळ शिष्टाचार म्हणूनच मी ती दिली. शेवटचा निरोप घ्यायच्या वेळी तरी झाले गेले विसरून जावे, नाही ? त्यांनी ती फेकून दिली. त्यांना माझी फुले औपचारिक वाटली असतील. वरपांगी वाटली असतील. त्यांचा तरी काय दोष ? प्रेमा आम्ही परत येईपर्यंत तू येथे राहा. माझ्या पक्ष्याची तू काळजी घे. त्याला वेळच्या वेळेस दाणापाणी देत जा. गोड फळ मिळाले, देत जा. त्याच्याजवळ बोलत बसू.' मिरी सांगत होती.

'मिरे, तुझा मुरारी कधी येईल ?'

'देव आणील तेव्हा.'

'आणि माझे कसे होईल ?'

'तुलाही प्रेमळ सहकारी मिळेल. जीवनाचा सोबती मिळेल. काळजी नको करूस.'

सुमित्राताईची मिरीने सारी तयारी केली. तिने काही सुंदर पुस्तके बरोबर घेतली. रंगाची पेटी, कुंचले हे सामानही तिने घेतले. तिलाही चित्रकलेचा नाद होता. कधी लहर लागली तर ती रंगात रंगून जात असे.'

समुद्रात एक छोटीशी लाँच तयार होती. दुसरेही कोणी उतारू तीत होते. ते पाहा आनंदमूर्ती, धिप्पाड डॉक्टर तेथे उभे आहेत.

'मिरे, तुझी वाट पाहात होतो. बायकांना नेहमी उशीर.' ते हसून म्हणाले.


'आम्ही वेळेवर आलो.' मिरी म्हणाली.

सारी मंडळी लाँचमध्ये बसली. लाँच निघाली. बाणाप्रमाणे पाणी कापीत निघाली. मिरी सागरलीला बघत होती आणि तिच्या तोंडाकडे डॉक्टरांचा तो अपरिचित पाहुणा बघत होता. एकाएकी मिरीच्या लक्षात ती गोष्ट आली आणि त्या गंभीर प्रवाशाने आपले डोळे दुसरीकडे वळविले कोण होता तो ? हरी जाणे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel