दुसर्‍या दिवशी दुसरी बोट आली. किनार्‍याला लागलेली माणसे जी जिवंत होती, ती बोटीत चढली. ती तरुणी आहे. सुमित्रा आहे. डॉक्टर आहेत. तो अपरिचित गृहस्थ आहे. परंतु मिरी कोठे आहे ?

'दु:खी मिरीने मुद्दामच स्वत:ला मागे ठेवले' सुमित्रा म्हणाली.

'मी तिसर्‍यादा जात होतो. परंतु बोटीजवळ जाण्यापूर्वीच सारा खेळ संपला होता. मिरीने त्या मुलीचे प्राण वाचवले. मिरी हुतात्मा झाली. थोर मनाची मुलगी. आपण दुर्दैवी, आपण कशाला जगावे असे जणू तिला वाटले.' तो पाहुणा म्हणाला.

'मिरीशिवाय घरी जाणे कसेसेच वाटते. कृपाकाका वरती काय म्हणतील ?' सुमित्रा स्फुंदत म्हणाली.
'तुम्हीच रडू लागल्यात तर आम्ही कसा धीर धरायचा ?' तो पाहुणा म्हणाला.

'ती माझ्या जीवनात किती खोल गेली होती ते तुम्हांस माहीत नाही. ती जणू माझा दुसरा प्राण बनली होती. बाबांच्या हल्लीच्या नव्या संसारात तिचाच मला आधार होता. काय सांगू !' सुमित्रा रडत म्हणाली.

'मला सारे माहीत आहे !'

'सारे माहीत आहे ?'

'हो. मिरीने तुमची हकीकत मला सांगितली होती.'

बोटीत आनंद नव्हता. शेवटी मिरीचे, सुमित्राताईचे गाव आले. बंदरावर गर्दी होती. मंडळी उतरली, त्या तरुणीच्या घरची मोटर होती. ती तीत बसली.

'तुम्ही आमच्याकडे चला. तुम्ही प्राणदाते.' सुमित्रा त्या पाहुण्याला म्हणाली.

'परंतु मिरीला मी वाचवू शकलो नाही. मीही दुर्दैवी आहे. जातो मी. वेळ आली तर पुन्हा भेटेन. डॉक्टर, ओळख ठेवा. प्रभू तुम्हांला सुखी ठेवो. तुम्ही थोर माणसे आहांत.' असे म्हणून तो पाहुणा गेला.

'कोण आहे हा पाहुणा ?' सुमित्राने विचारले.

'प्रभूने तुमच्या संगतीत राहायला पाठविलेला तो देवदूत आहे.' डॉक्टर म्हणाले.

'त्याच्या निरपेक्ष प्रेमाने आम्हीच पवित्र झालो.' ती म्हणाली.

डॉक्टर नि सुमित्रा कृष्णचंद्रांच्या घरी आली. सुमित्रा अश्रू ढाळीत बंगल्यात शिरली. कृष्णचंद्र बाहेर आले.

'आलात सुखरूप ? मिरी कोठे आहे ? का मुरारी नि ती गेली यात्रेला ?' त्यांनी विचारले.

'बाबा, मिरी बुडाली. आम्ही वाचलो. तिने आम्हांला वाचवले. स्वत: मागे राहिली. गेली.' सुमित्रा म्हणाली.

'मुरारीला कळल्यावर तो जीव देईल.' ते म्हणाले.

'त्याचे तिच्यावर प्रेम नाही असे कळले.' ती म्हणाली.

'डॉक्टर, बसा.'

'मी आता जातो. मागून भेटेन.'

डॉक्टर आपल्या घरी गेले. सुमित्रा आपल्या खोलीत शून्य मनाने बसली होती. प्रेमा घरीच होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel