महाभारतानुसार महाराज शांतनू चा पुत्र भीष्म याने भगवान परशुराम यांच्याकडूनच अस्त्र - शस्त्र विद्या प्राप्त केली होती. एकदा भीष्माने काशीला होणाऱ्या स्वयंवरातून काशीराजाच्या कन्या अंबा, अंबिका आणि बालिका यांना आपला छोटा भाऊ विचित्रवीर्य याच्यासाठी उचलून आणले होते. तेव्हा अंबाने भीष्माला सांगितले की मनातून तिने दुसऱ्या कोणालातरी आपला पती मानले आहे. तेव्हा भीष्माने तिला सन्मानपूर्वक सोडून दिले. परंतु तिने ज्याला आपला पती मानले होते, त्याने तिचे अपहरण झाल्यामुळे तिला नाकारले.
तेव्हा अंबा भीष्माचे गुरु परशुराम यांच्याकडे गेली आणि त्यांना आपली व्यथा सांगितली. तिची गाथा ऐकून भगवान परशुरामांनी भीष्माला तिच्याशी विवाह करण्यास सांगितले, परंतु ब्रम्हचारी असल्याने भीष्माने तसे करण्यास नकार दिला. तेव्हा भीष्म आणि भगवान परशुराम यांच्यात भीषण युद्ध झाले, परंतु शेवटी आपल्या पितरांचे सांगणे ऐकून भगवान परशुरामाने शस्त्र खाली ठेवले. अशा प्रकारे या युद्धात ना कोणाचा पराजय झाला, ना विजय.