लहानपणी परशुरामाचे माता पिता त्याला राम म्हणून हाक मारत असत. जेव्हा राम थोडा मोठा झाला तेव्हा त्याने आपल्या पित्याकडून वेदांचे ज्ञान प्राप्त केले आणि त्यांच्यासमोर धनुर्विद्या शिकण्याची इच्छा प्रकट केली. महर्षी जमदग्नी यांनी त्याला हिमालयात जाऊन भगवान शंकराला प्रसन्न करण्यास सांगितले. पित्याची आज्ञा मानून रामाने तसेच केले. त्याच सुमारास असुरांच्या त्रासाने त्रस्त असलेले देवता भगवान शंकराकडे गेले आणि त्यांना राक्षसांपासून मुक्ती देण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा शंकराने तपश्चर्या करणाऱ्या रामाला असुरांचा विनाश करायला सांगितले.
रामाने कोणत्याही शस्त्राशिवायच असुरांचा विनाश केला. रामाचा हा पराक्रम पाहून भगवान शंकरांनी त्याला अनेक अस्त्र - शस्त्र प्रदान केली. यांमध्येच एक परशू होता. हे अस्त्र रामाला अतिशय प्रिय होते. हे अस्त्र प्राप्त करताच रामाचे नाव परशुराम झाले.