लॅरी सॅव्ह्डकीन गेल्या आठ तासांपासून पाण्याशी झगडत होता. दूर अंतरावर त्याला चीनचा समुद्रकिनारा दिसत होता. दूर अंतरावर त्याला गस्त घालणा-या जपानी बोटी दिसत होत्या. सुरवातीला जपान्यांना टाळण्याचा त्याने विचार केला, परंतु खुल्या समुद्रात आपण बुडून मरू याची त्याला कल्पना होती. पी-३४ वरील एका लाईफबोटीवरील खलाशांचं लक्षं वेधून घेण्यात अखेर तो यशस्वी झाला. सॅव्ह्डकीनची पी-३४ वर रवानगी करुन ती लाईफबोट पुन्हा तिथे परतली.
पाण्याखाली गेलेल्या टँगमधून निसटलेले पाच नौसेनीक अद्याप बुऑयला धरुन होते. टँगची शेवटची शिकार ठरलेल्या बोटीचा अद्यापही पाण्यावर असलेला भाग त्यांना दिसत होता. प्रवाहात अनुकूल बदल झाल्यावर त्या दिशेने जाण्याचा प्रयत्नं करण्याचं त्यांनी एकमताने ठरवलं.
काही वेळाने जपानी लाईफबोट त्यांच्या दृष्टीस पडली. लाईफबोट जवळ आल्यावर एका जपानी नौसेनीकाने त्यांच्या दिशेने आपल्या रायफलचा नेम धरला !
' खलास !' जेसी डी'सिल्वाच्या मनात आलं, ' ते आपल्याला गोळ्या घालणार !'
परंतु जपान्यानी गोळी झाडली नाही. रायफलच्या धाकाखाली त्यांना लाईफबोटीत चढण्याचा हुकूम देण्यात आला. सर्वात प्रथम त्यांनी पॉल लार्सनला लाईफबोटीत चढवलं. सर्वजण वर आल्यावर त्यांनी लार्सनला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करण्यास सुरवात केली. लार्सनचा श्वास मंदपणे चालू होता, परंतु तो वाचण्याची शक्यता फारच कमी होती.
दोन जपानी नौसेनीकांनी तो बुऑय ओढण्यास सुरवात केली. परंतु तो बुऑय त्यांना ओढता येईना. तळाशी असलेल्या पाणबुडीला तो बुऑय बांधलेला आहे हे जपान्यांना सांगण्याची कोणाचीही हिंमत नव्हती.
लाईफबोट पी-३४ कडे परतली. दोराच्या शिडीवरुन एकेक जण डेकवर पोहोचला. जेसी डि'सिल्वाने शेवटच्या क्षणी मागे दृष्टीक्षेप टाकला.
मृत्यूपंथाला लागलेल्या बेशुध्द पॉल लार्सनला दोघा जपान्यांनी समुद्रात फेकलं होतं !
वाचलेले नऊ अमेरिकन हे पाणबुडीवरील नौसेनीक आहेत याची लवकरच जपानी अधिका-यांना कल्पना आली. त्यांनी या सर्वांचा अघोरी छळ आरंभला.
टँगच्या शेवटच्या मोहीमेत बुडवलेल्या बोटींवरील वाचलेले जपानी नौसेनीक पी-३४ वर होते. त्यापैकी अनेकजण गंभीररित्या जखमी झालेले होते. कित्येकजण भाजलेले होते. आपल्या या अवस्थेला कारणीभूत असलेले अमेरिकन समोर दिसताच त्यांनी त्यांना तुडवून काढण्यास सुरवात केली. आपल्याच हल्ल्यातून वाचलेले जपानी सैनीक आपल्याला मारत असल्याची कल्पना आल्यावर ओ'केन सह सर्वांनी हसतहसत मार खाणं पसंत केलं !
टँगवरील ८७ नौसेनीकांपैकी फक्त ९ जण वाचले होते. ७८ जणांना जलसमाधी मिळाली होती.
शेवटचा टॉर्पेडो टँगवर आदळल्यावर ब्रिजवर असलेले कमांडर डिक ओ'केन आणि बिल लेबॉल्ड आणि कोनींग टॉवरमधून ब्रिजवर आलेला फ्लॉईड कॅव्हर्ली हे टँग बुडाल्यापासून समुद्रशी झगडत वाचले होते.
लॅरी सॅव्ह्डकीन पन्नास फूट खोल पाण्यातून कोणत्याही ऑक्सीजन उपकरणाविना वर येण्यात यशस्वी झाला होता.
सिडने जोन्स आणि डॅरील रेक्टर लेबॉल्डच्या नजरेसमोर सागरात गडप झाले होते. चीनच्या दिशेने पोहत निघालेला जॉन ह्यूबेक कधीच चीनला पोहोचला नाही !
क्लेटन डेक्कर, बिल बेलींजर, हेस ट्रक, पीट नेरॉवन्स्की, हँक फ्लॅगनन, जेसी डी'सिल्वा, पॉल लार्सन आणि हॉवर्ड वॉकर १८० फूट खोलीवर बुडालेल्या टँगमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते, परंतु दुर्दैवाने बेलींजर, लार्सन आणि वॉकरला मृत्यूने गाठलं होतं.
दुस-या महायुध्दात सुमारे ३५०० अमेरिकन नौसेनीक बुडालेल्या पाणबुड्यांत सागरतळाशी गेले होते. कोणत्याही मदतीविना बुडालेल्या पाणबुडीतून बाहेर पडण्यात फक्तं टँगवरील नौसेनीकांना यश आलं होतं.
मॉमसेन लंग्जचा यशस्वी उपयोग फक्त टँगवरील नौसेनीकांनी केला होता.
टँगवरील वाचलेले नऊजण आता जपान्यांचे युध्दकैदी होते. त्यांच्या भविष्यात काय वाढून ठेवलेलं होतं ?
पी-३४ च्या डेकवर पाच दिवस त्यांना रोज मारहाणीला सामोरं जावं लागत होतं. त्यांच्या पाणबुडीची माहीती काढून घेण्यासाठी त्यांचे अनन्वीत हाल करण्यात येत होते. रिचर्ड ओ'केनच्या सूचनेवरुन त्यांनी फक्तं पाणबुडीचं नाव जपानी अधीका-यांना सांगीतलं, परंतु पाणबुडीवरील शस्त्रास्त्रं, कोड संदेश आणि पाणबुडी बुडालेली नेमकी जागा जपान्यांना सांगण्यास त्यांनी साफ नकार दिला.
पाच दिवसांनी पी-३४ तैवान बंदरात पोहोचली. बंदरात उतरल्यावर सर्वांना एका ट्रकवर चढवण्यात आलं आणि सर्व शहरातून त्यांची धिंड काढण्यात आली. आजूबाजूचे जपानी सैनीक आणि नागरिक त्यांना उद्देशून कुत्सीत भाषेत ओरडा-आरडा करत होते. मधूनच एकादा सैनीक त्यांना ठोसे लगावत होता.
दिवसभर शहरातून धिंड काढल्यावर रात्री त्यांना एका तुरुंगात नेण्यात आलं. तिथल्या जपानी अधिका-यांनी त्यांची उलटतपासणी घेण्यास सुरवात केली. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही की लाथांचा प्रसाद ठरलेलाच होता. अधून-मधून एक जपानी अधिकारी आपली तलवार उपसून त्यांना शिरच्छेद करण्याची धमकी देत होता. रात्रभर त्यांची चौकशी आणि मारहाण सुरू होती.
सकाळ होताच त्यांना एका ट्रकमध्ये भरुन रेल्वे स्टेशनवर नेण्यात आलं आणि रेल्वेने फार्मोसा बेटाच्या पार दुस-या टोकाला असलेल्या किरुन बंदरात नेण्यात आलं. संध्याकाळी उशीरा तिथे असलेल्या जुन्या पोर्तुगीज तुरूंगात त्यांची रवानगी करण्यात आली.
काही दिवस त्या तुरूंगात काढल्यावर त्यांची रवानगी जपानच्या मुख्य भूमीवर करण्यात आली. तिथे अॅडमिरल दर्जाच्या एका अधिका-याने त्यांची चौकशी केली, परंतु त्यांना अत्यावश्यक असलेले कोरडे कपडे आणि बूट देण्याची विनंती त्याने धुडकावून लावली. त्यानंतर जपानमधील प्रमुख औद्योगीक शहर असलेल्या योकोहामाच्या दिशेने पुन्हा रेल्वेचा प्रवास सुरु झाला.
योकोहामाला पोहोचल्यावर एका धुळीने माखलेल्या रस्त्यावरुन एका बसने त्यांची रवानगी एका खास तुरूंगात करण्यात आली.
ऑफूना !
टॉर्चर फार्म !
जपानी मिलीटरी इंटेलीजन्सचा हा खास तुरूंग होता. जिनेव्हा करारातील सर्व तरतुदी धाब्यावर बसवून जपान्यांनी या तुरुंगाची निर्मीती केलेली होती. युध्दकैद्यांना मिळणा-या कोणत्याही सवलती या तुरूंगातील कैद्यांना देण्यात येत नव्हत्या.
जपानी अधिका-यांच्या मतानुसार जपानी नौदलातील ९०% सैनीक हे सामान्य नागरीक होते, त्यामुळे त्यांच्याविरुध्द लढताना पकडलेल्या अमेरिकनांना जपानी युध्दकैदी मानतच नव्हते ! त्यांच्यादृष्टीने पकडलेले सैनीक हे घातकी गुन्हेगार होते. त्यातच टँगवरील वाचलेल्या नौसेनीकांचा जीव अधिकच धोक्यात होता. जपानी अधीकारी त्यांना उघडपणे सांगत,
" समुद्रात बुडालेल्या पाणबुडीतून कोणीच कधी वाचत नाही. आम्ही तुम्हांला खलास करून फेकून देऊ ! कोणाला पत्ताही लागणार नाही !"
टँगमधून वाचलेल्यांनी पाणबुडीविषयी बेधडक थापा मारण्याचं सत्रं आरंभलं होतं. परंतु त्यांची थापेबाजी एकदा त्यांच्या अंगाशी आली.
रिचर्ड ओ'केनची चौकशी सुरू होती. ओ'केन पाणबुडीचा कमांडर असल्याने त्याला पाणबुडीच्या एकंदर संरचनेची आणि शस्त्रास्त्रांची संपूर्ण माहीती असणार याची जपानी अधिका-यांना पक्की खात्री होती.
" तू किती वेळा पाणबुडी घेऊन मोहीमेवर गेला होतास ?" चौकशी अधिका-याने ओ'केनला विचारलं.
" पाच वेळा !" ओ'केन उत्तरला.
" किती जपानी बोटी बुडवल्यास ?"
" पाच मोहीमांत मिळून एकूण पाच !" ओ'केनने दडपून सांगीतलं.
" अस्सं ?" जपानी अधिकारी कुत्सीतपणे हसला, " कमांडर ओ'केन फक्त पाच बोटी बुडवल्यावर अमेरिकन अध्यक्षांचं खास पदक ( प्रेसीडेन्शीयल युनिट साईटेशन ) मिळतं वाटतं ?"
जपान्यांचं सर्वात जास्तं नुकसान करणारी पाणबुडी म्हणून टँगला अमेरिकन अध्यक्षांचं खास पदक ( प्रेसीडेन्शीयल युनिट साईटेशन ) जाहीर झालं होतं. जपान्यांना त्याचा नेमका पत्ता लागला होता.
रिचर्ड ओ'केनला बेशुध्द पडेपर्यंत मारहाण करण्यात आली !
अमेरिकन नौदलाने टँग युध्दात गमावल्याचं १९४४ च्या नोव्हेंबर महिन्यात जाहीर केलं.
टँगमधील नौसेनीकांच्या कुटुंबियांवर दु:खाची कु-हाड कोसळली !
टँगच्या पहिल्या चार मोहीमांत एक्झीक्युटीव्ह ऑफीसर असलेल्या मरे फ्रेजीला टँग बुडाल्याची बातमी मिळाली तेव्हा तो हवाईत पर्ल हार्बर इथे कार्यरत होता. जपानी संदेशांची फोड करणा-या एका गुप्तहेराकडून टँग सागरतळाला गेल्याची खात्रीलायक बातमी त्याला मिळाली होती. त्याचवेळी टँगवरील रिचर्ड ओ'केनसह नऊ नौसेनीक वाचल्याचं आणि जपान्यांचे युध्दकैदी असल्याचंही त्याला खात्रीपूर्वक कळलं होतं !
फ्रेजीने ओ'केनच्या पत्नीला ही बातमी द्यावी असा विचार केला, परंतु पूर्ण विचाराअंती अखेर त्याने युध्द संपेपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला. टँगवरील वाचलेल्या नौसेनीकांची बातमी अमेरिकेत पोहोचल्याचं जपान्यांना समजल्यास ते आपले गुप्त संदेश देणारे कोड बदलण्याची शक्यत होती. युध्दाच्या अंतिम टप्प्यात तसं होऊ देणं हे अमेरिकेला परवडणारं नव्हतं. त्यामुळे मनावर ताबा ठेवून फ्रेजीने आपलं तोंड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
टँगमधील वाचलेल्या नऊजणांना आपल्या कुटुंबियांच्या काळजीने ग्रासलं होतं. वाचलेल्या नऊपैकी सात जण विवाहीत होते. पीट नेरॉवन्स्कीचा घटस्फोट झाला होता. त्याला चार वर्षांची मुलगी होती.
६ ऑगस्ट १९४५ ला जपानला हादरवणारा पहिला अणुबाँब हिरोशीमावर पडला ! पाठोपाठ ९ ऑगस्टला दुस-या अणुबाँबने नागासाकीची राखरांगोळी केली.
दोन अणुबाँबने झालेल्या मनुष्यहानीमुळे हादरलेल्या जपानने अखेर शरणागती पत्करली.
२ सप्टेंबर १९४५ रोजी टोकीयो बे मध्ये यूएस्एस् मिसूरी या बोटीच्या डेकवर दोस्त सैन्याचा पॅसिफीकमधील सर्वोच्च सेनापती जनरल डग्लस मॅकआर्थरने जपान सरकारची शरणागती स्वीकारली.