"नदी का बुडवील ? मातेच्या प्रेमसागरांत बुडून का कोणी मरतो ? अमृताच्या सिंधूत बुडी मारण्याची कां भीति वाटावी ? नाहीं. ही लोकमाता मला बुडवणार नाहीं. मारतें मी उडी.' वत्सला हंसून म्हणाली.
"वत्सले, म्हाता-या आजीचा अंत पाहूं नकोस. तुझ्यासाठी मी जगत आहे.' सुश्रुता सद्गदित् होऊन म्हणाली.
"बरें, रडूं नको तूं. मी तेथें थोडयाशा खळखळ पाण्यांत जाऊन अंग धुतें.' ती म्हणाली. वत्सला बरीच पुढें गेली. पाणी फार नव्हतें तेथें. परंतु पाण्याला जोर होता.
"आजी, नदी मला ओढीत आहे. चल म्हणत आहे. जोर करीत आहे.' थट्टामस्करी करीत वत्सला म्हणाली.
"तूं इकडे ये. पाण्याला तेथें ओढ आहे. एकदां घसरलीस तर सांवरतां येणार नाहीं. पुढें डोह आहे. ये इकडे पोरी.' आजी म्हणाली.
इतक्यांत घों घों आवाज येऊं लागला. जणू समूद्राचा आवाज ! नदी पुढें समुद्राकडे जात होती. तो लबाड समुद्रच तिला पकडण्यासाठी पाठीमागून घों घों करीत येत होता की काय ? का नदीचा पिता पर्वत रागावून तिला परत नेण्यासाठी येत होता ? घों घों आवाज - कसला बरें आवाज !
"आजी, हा बघ घों घों आवाज. माझ्या हृदयांतहि घों घों आवाज होत आहे. तेथें जणूं तुफान सागर उचंबळत आहे ! हा जीवनांतीलच आवाज का बाहेर ऐकूं येत आहे ? घों घों आवाज. गोड परंतु भेसूर ! अंगावर रोमांच उभे करणारा आवाज. जीवनाच्या तारा न् तारा कंपायमान करणारा आवाज ! घों घों आजी, हा आवाज थरकवतो ! परंतु उन्मादवितो. विलक्षण आवाज !' "पळा, पळा सारी, प्रचंड लोंढा वरून येत आहे. पळा, निघा सारीं पाण्यांतून. या लौकर बाहेर. मुलांनो, निघा बाहेर, बायांनो, निघा बाहेर ! हा पाहा कचरा आला वाहत - येणार. प्रचंड लोंढा येणार ! पाणीं चढूं लागलें ! आले रें आले ! घों घों करीत पाणी आलें, पळा, पळा !'
एकच हांक झाली. कोणाचे कलश तेथेंच राहिले. कोणाची भांडी तेथेंच राहिलीं, कोणाची वस्त्रें राहिलीं, कोणाची आसनें राहिलीं. धांवपळ झाली. पाण्यांतून भराभरा पळतां येईना. कोणी ठेंचाळले, पडले. पुन्हां घाबरून सांवरले. तीरावर येऊन एकदांचे उभे राहिले.
परंतु वत्सला कोठें आहे ? ती पाण्यांत नाचत आहे, तिला भय ना भीति !