नागानंद गाणें म्हणूं लागला. वत्सला व कार्तिक ऐकत होती. शांत वाहणारी शीतल नदी ऐकत होती. त्या टेकडीवरील नि:स्तब्ध शांतताहि ऐकत होती.
(चाल- आरती मंगळागौरी)
ये ग शीत्लाई
प्राणी करतो तापें कर तूं घाई ॥ ये.॥
हिमालयामधलें सोडून येई घर
सोडून येई सागर नद्या नि निर्झर
वृक्षवेलीलतांमधून ये भरभर ॥ ये.॥
तुषारांतून येई लाटांमधून येई
पानांमधुन येई पाण्यामधुन येई
चंदनांतुन येई जंगलांतुन येई ॥ ये.॥
राईंतुन येई दरींतुन येई
आरसपानी पाषाणांतुन येई
दंवांतुन येई दह्यांतुन येई ॥ ये.॥
तळमळे रोगी थांबव त्याची आग
जें जें पाहिजे असेल तें तें आई माग
तुझे आई भक्त आम्ही सारे नाग ॥ ये.॥
आली आली आई घाला रे वारा
आली आली आई उडवा जलधारा
ताप पळून जाईल क्षणांत हा सारा ॥ ये.॥
'सा-या शीतल पदार्थांतून शीतलाईला आवाहन केलें आहे. वेदांतसुध्दां अशा प्रकारचे मंत्र आहेत.' कार्तिक म्हणाला.
'मानवी मन सर्वत्र एकच आहे. वरची कातडी गोरी असो कीं काळी असो, आंतील भुका त्याच असतात. आंतील आशा-आकांक्षांचे, नाना कल्पनांचे, वासनाविकारांचे प्रकार समानच असतात.' नागानंद म्हणाला.
'आपण येथेंच उभीं राहिलों ! घरीं जाऊं म्हटलें नि बोलत उभींच राहिलों. आजी वाट पाहात असेल.' वत्सला म्हणाली.
'का गेली चोराबरोबर पळून अशी शंका येईल तिला.' कार्तिक म्हणाला.
'मी जातोंच येथून पळून.' नागानंद म्हणाला.