'नागानंद ! ' सुश्रुतेनें भावपूर्ण शब्दानें हांक मारली.
'काय, आजी ? ' त्यानें विचारिलें.
'अरे, माझा मुलगा. या वत्सलेचा पिता, तो तर मग तुम्हांलाच वाचवण्याच्या कामांत मेला. अंग भाजून तो घरी आलां. नाहीं झाला बरा. तो मेला. त्याच्याबरोबर वत्सलेची आई सती गेली. तेव्हां वत्सला वर्षाचीहि नव्हती. ती पोरकी झाली. तो आजारीपणांत म्हणत असे, 'कशीं होती आवळींजावळीं मुलें. एक गोरें, एक काळेंसावळें. जणूं दिवस व रात्रच जन्माला आली.' नागानंद ! आणि वांचलेले तुम्ही वत्सलेला वांचवायला आलांत ! योगायोगाच्या गोष्टी. त्यानें - रत्नाकरानें - तुला आगींतून वांचवलें. तूं वत्सलेला पाण्यांतून वांचवलेंस. नागानंद, रडूं नको. झालें गेलें. नको रडूं, बाळ' सुश्रुता त्याला जवळ घेऊन म्हणाली.
'आजी, आम्ही अभागी. मी अभागी. मीं वत्सलेला पोरकें केलें. मला वांचविण्यासाठीं तिचे वडील न येते तर ते राहते. मग वत्सलेची आईहि राहती. अरेरे, माझ्यामुळें हें सारें ! माझ्यामुळें हें सारें ! दुर्दैवी कपाळकरंटा मी.' असें म्हणून तो डोक्यावर थडाथड हात मारून घेऊं लागला. सुश्रुतेंने त्याला शांत केलें. मुलासारखा तेथें तो बसला. सुश्रुतेच्या मांडीवर तो झोंपला.
वत्सला गात गात बाहेरून आली. वनदेवतेप्रमाणें नटून आली. केसांत फुलें घालून आली. कानांत फुलें घालून आली. गळयांत फुलांच्या माळा घालून आली. नाना रंगांचीं वनफुलें. नाना गंधांची वनफुलें. वत्सला आली तों तिला शांत व गंभीर असें दृश्य दिसलें.
'वत्सलें, गडबड करू नको.' आजी म्हणाली.
'यांना पाहायला यांच्या झोंपडींत गेलों आम्ही. तों तेथें कोणी नाहीं. यांची बांसरी आम्हीं वाजविली. परंतु नीट वाजवितां कोणालाच येईना. केव्हां आले हे ! झोंपलेतसे, आजी ? यांना का बरें वाटत नाही ? ही बघ यांच्या पायावरची ती जखमेची खूण. माझ्या पदराची पट्टी बांधली होती तेथें. कां ग हे निजलेत ? उठवतें मी त्यांना. गुदगुल्या करूं ? कानांत फुलांचा देंठ घालूं ? ' वत्सला हळूहळू आजीचा हात ओढीत विचारीत होती.
'वत्सले, आज एक महत्त्वाची गोष्ट कळली. सहज त्यांचा बोलण्यांतून प्रकट झाली. तुझ्या पित्यानें जळणा-या घरांतून जीं दोन मुलें काढलीं त्यांतील एक हे नागानंद ! ते तुझे वडील असें कळल्यामुळें यांना दु:ख झालें. माझ्यामुळें वत्सलेचे आईबाप गेले असें कळून नागानंद रडूं लागले. डोकें फोडून घेऊं लागले. मी त्यांना शांत केलें. आतां निजले आहेत मुलासारखें. ' आजीनें सांगितलें.
'माझ्या बाबांनी यांना वांचविलें, यांनीं मला ! काय आहे योगायोग ! आजी, काय आहे हें सारें ?' तिनें आजीला विचारलें.