कांही दिवसांनी वत्सला प्रसूत झाली तिला मुलगा झाला सुश्रुतेला आनंद झाला. तिला पणतू झाला. कोणतें ठेवावें नांव ? चर्चा झालीं. शेवटीं शशांक हे नांव ठेवण्यांत आलें. सुंदर होता मुलगा. तो गोरागोरा होता. रींग आईचा होता. नाकडोळे बापाचे होते.
'माझ्या रंगाचा आहे माझा बाळ.' वत्सला म्हणे.
'परंतु दृष्टि माझी आहे. रंग महत्त्वाचा कीं दृष्टि महत्त्वाची ? जशी दृष्टि तशी सृष्टि. जशी दृष्टि तसा रंग. जगांत दृष्टि महत्त्वाची आहे. रंग नाहीं.' नागानंद म्हणे.
'बरें, भांडण नको.' ती हंसून म्हणे.
शशांक वाढू लागला. आठ महिन्यांचाच तो चालूं लागला. बडबड करूं लागला. आठा महिन्यांचे बारा झाले. वर्षांची दोन वर्षें झालीं. शशांक बाहेर हिंडूं फिरूं लागला. त्याला पाय फुटले. पंख फुटले. तो दूध सांडी, फुलें कुसकरीं. मग सुश्रुता खोटें खोटें त्याला रागे भरे, मग त्याच्या डोळयांत पाणी येई. त्याचें तोंड गोरेमोरें होई. पणजीबाई मग त्याला पटकन् उचलून त्याचे पटापट मुके घेई.
आईबापांच्या व पणजीच्या प्रेमळ सहवासांत शशांक वाढत होता. कधीं त्याला शेतावर नेत. तेथें तो वासरांशी खेळें. गाईच्या अंगाला हात लावी. लहानसें भांडे घेऊन झाडांना पाणी घाली. सृष्टीच्या सहवासांत बाळ शशांक मोठी दृष्टि घेत होता. उंच झाडांकडे बघून उंच होत होता. चपळ हरणांशी खेळून चपळ होत होता. मोरांना बघून सूंदर होत होता.
तो शेजारच्या मुलांत खेळावयास जाई. तीहिं त्याच्याशी खेळत. परंतु एके दिवशीं एक प्रकार घडला.
'त्या शशांकाला नका रे खेळायला घेत जाऊं. त्याच्याशीं नाहीं खेळायचें. जा रे. शशांक. येथें येत जाऊं नकोस. तूं आर्य जातीचा नाहींस. तूं नीच जातीचा आहेस. जा येथून.' एका मुलाचा बाप येऊन म्हणाला.
ती मुलें बघत राहिलीं. शशांक रडूं लागला. त्यला कांही कळेना. कालपर्यंत तीं मुलें एकत्र खेळलीं. आजच कां नको ?
'आम्हीं खेळूं त्याच्याबरोबर ! ये रे, शशांका. शशांक आमचा मित्र आहे.' एक लहान मुलगा म्हणाला.
'बाप शिक्षा करील, तेव्हां समजेल.' तो शिष्ट म्हणाला.