'राजा, माझ्याहून थोर अशा व्यक्ति तूं आंगींत फेंकण्यासाठी उभ्याकेल्या आहेस. या सहस्त्रावधि माता, यांच्यात का दिव्यता नाहीं ?  हे सहस्वावधि पुरुष तूं उभे केलेस. त्यांच्यांत का पुण्याई नाहीं ? हीं शेकडों मुलें तूं बांधून उभी केलीं आहेस. त्या मुलांहून कोण रे, निर्मळ ? या पृथ्वीला जी कांही थोडी पवित्रता व मधुरता आहे, या पृथ्वीला जी कांहीं थोडीं गोड शांति व गोड आनंद मिळतो, तो ह्या अकपट मुलांमुळे. मुलें म्हणजे संसारवृक्षाची फुलें. ह्या सर्वांचे तूं हवन करणार व मला वांचवणार ? ती वत्सला, ते थोर नागानंद, एकेक पृथ्वी-मोलाचीं माणसें तूं जाळण्यासाठी उभी केलींस ! हा भयंकर आसुरी संहार आरंभलास ! आम्हांला कसें जगवेल ? राजा, आम्हांलाहि जाळ. कोठल्या होमकुंडांत शिरूं ? शिष्यांना गुरूंने मार्ग दर्शविला पाहिजे. मला शिरूं दे. माझ्या पाठोपाठ हे कुमार येतील.' आस्तिक शांतपणें बोलत होते.

'भगवन्, नागजातीचा मला कां राग येऊं नये ? माझ्या पित्याचा दुष्टपणें यांच्यातीलच एकानें प्राण घेतला. हे लोक दुष्ट नाहीत ? 'जनमेजयानें विचारिलें.

'राजा, अर्जुनानें-तुझ्या पणजोबानें-तक्षकांच्या सर्व वसाहती जाळून टाकिल्या. हजारों नाग त्या वेळीं त्या आगींत भाजून मेले. त्या आगींत भस्म झाले. त्या आगींतून पळून जाणारेहि आगींत फेंकले गेले. तक्षकवंशांतील एक तरूण फक्त वांचला, तुझ्या पित्यानें नागाच्या ऋषींची विटंबना केली. ऋषींच्या गळयांतून मारलेले साप अडकवले. तुम्ही आर्यांनी नागांना भरडून काढलें आहे. तुम्हीं नागांवर इतके अत्याचार केले आहेत, कीं तुकचें शासनच करावयाचें झालें तर तुम्हां सर्व आर्यांचे राईराईएवढे तुकडे करावे लागतील. तरीहि ती शिक्षा कमीच होईल. आर्यांनी नागांना छळलें, जाळलें, पोळलें; तुम्ही त्यांच्या सुपीक वसाहती बळकावल्यांत. त्यांना दूर हांकललेंत. त्यांना केवळ दास केलेत. त्यांच्या स्त्रियांना केवळ करमणूक म्हणून क्षणभर जवळ घेतलेंत व मग दूर फेंकलेंत. तरीहि ते नाग शांत होते. आतां त्यांची दैवतेंहि तुम्ही अपमानू लागलात. त्यांच्या सुंदर पाषाणी नागमूर्ति फेकूं लागलात. ते शांत राहणारे, तुमचे सहस्त्रावधि अपराध पोटांत घालणारे नाग ते आतां उठले. ते का क्रूर ? ते क्रूर कां तुम्ही क्रूर ? जेत्यांना स्वत:चा क्रूरपणा दिसत नाहीं. जितांची कत्तल करण्यांतहि आपण त्यांना करुणाच दाखवीत आहोंत, त्यांना लुटण्यांत आपण त्यांच्यावर उपकार करीत आहोंत. त्यांना गुलाम करण्यांत आपण त्यांना संस्कृतिच देत आहोत, असे त्यांना वाटतें. खड्ग म्हणजे संस्कृति नव्हें. मनुष्यांचा वध करणें म्हणजे संस्कृति नव्हें. दुस-यांच्या झोपडया जाळून आपले प्रासाद उठविणें म्हणजे सुधारणा नव्हें. माणुसकीची वाढ म्हणजे सुधारणा. मला तर सारा क्षुद्रपणा दिसत आहे. केवळ हीनवृत्ति दिसत आहे. केवळ द्वेष दिसत आहे. नाग म्हणे क्रूर. नाग म्हणजे वाईट, कां रे बाबा ? ईश्वराने का एखाद्या विशिष्ट मानववंशाला केवळ क्रूर असेंच निर्मिलें ?  भलेबुरें सर्वांत आहेत. आर्यांत अत्यंत दुष्ट असतील, तर नागांत महात्मे मिळतील. कोणी कोणास हंसूं नये. प्रकाश व अंधार सर्वत्र आहे. फुलं व कांटे सर्वत्र आहेत. अशी कोणती जात आहे कीं ती केवळ पवित्र आहे, नि:स्वार्थ आहे, निष्कलंक आहे ? सर्व सुंदर एक परमेश्वर आहे. आपणांस एकमेकांचे गुण घेत व स्वत:चे दोष दूर करीत पुढें जावयाचें आहे. दुस-यांची हत्त्या करून परमेश्वराच्या मंदिरांत प्रवेश करतां येणार नाहीं.

नागजातींवर तूं उगीच तुटून पडत आहेस. गांवोगांव भले संबंध उत्पन्न होत होते, परंतु तूं पुन्हां खो घातलास. आतां कांही नाग इंद्राकडे गेले. तूं का त्यांच्याशी लढाई करणार ? पुन्हां कांहीं या बाजूस, कांहीं त्या बाजूस, उभे राहून का सारे मरणार ? पुन्हां सत्पुत्रांच्या रक्ताचा सडा भारतमातेच्या अंगावर सांडणार ? राजा, गंगा, यमुना, सिंधु, ब्रह्मपुत्रा, तापी, नर्मदा, कृष्णा गोदावरी, तुंगभद्रा, कावेरी वगैरे मंगल नद्यांनी सुपीक व सुंदर झालेल्या या भारतमातेचीं तुम्हीं सारीं मुले. जिच्या पायाशीं सागर खेळत आहे व जिच्या डोक्यांशी हिमालय नम्रपणें उभा आहें अशीं हीं भव्य भूमातेचीं तुम्हीं लेंकरें  ! आपल्यांच मुलांच्या आपसांतील मारामारीनें आपल्या अंगावर त्यांचे रक्त सांडावें असें कोणत्या मातेला पाहवेल, सहन करवेल ? ही मातां पाताळांत गडप होऊं पाहील. येथील हवापाणी, अन्न तुम्हाला तेवढें पवित्र करतें,व नागांना नेमकें अपवित्र करतें का ?  हा अहंकार आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel