'राजा, हा आस्तिक तुझ्याजवळ ही प्रेमभिक्षा मागत आहे. राजानें नाहीं म्हणू नये, घाल ही ऐक्याची भिक्षा भांरताच्या इतिहासांतील दिव्य शेवटी कठोरांतील कठोरहि विरघळतो. कठोरता आत्मचंद्राला कायमची चिकटूं शकत नाहीं. ती शेवटीं गळते. ती पाहा तुझी कठोरतापाझरली. राजा, तुझ्या डोळयांतून पाणी आले ! '
'भगवन् मला क्षमा करा. मलाच ह्या पाप्याला होळींत फेंका. माझेंच दहन करा. मी अपराधी आहें. या सहस्त्रावधि मातांच्या शापांनी मी आधींच जळून गेलों असेल.' जनमेजय आस्तिकांच्या पायांवर पडून म्हणाला.
'ऊठ, राजा ऊठ. आलेले वादळ गेलें. द्वेषपटल गेलें. तुझ्या हृदयांतील खरा धर्मसूर्य जागा झाला. आतां कशाला मरूं इच्छितोस ? या हजारों माता तुला आशीर्वाद देत आहेत. पाहा त्यांची मुखें फुललीं. त्यांचे डोळे भरून आले. ते अश्रुं तुझे जीवन फुलवतील. ते आशीर्वादाचे अश्रु आहेत. आतां मरण्याची इच्छा नको करूं. आतां तर तुझा सर्वांना खरा आधार. आतां चिरंजीव हो. हें ऐक्य वाढव. या ऐक्याला सर्वत्र हिंडून फिरून पाणी दे. पूर्वीच्या जीवनावर पडदा पडूं दें. झाले गेले सर्वजण विसरून जाऊं. अंधारांतील प्रकाश जीवनात भरूं.' आस्तिक म्हणाले.
सर्व नागबंदींना मुक्त करण्यांत आले. मुले आईबापांना बिलगली. सखे सख्यांना भेटले. पत्नींनीं पतींकडे अश्रुपूर्ण दृष्टीनें प्रेमाने पाहिले. तेथें प्रेमाचा सागर उचंबळला. आनंदाचा सागर उचंबळला. जयजयकार गगनांत गेले. 'महाराजाधिराज जनमेजयांचा विजय असो', 'भगवान् आस्तिकांचा विजय असो', 'शांतिधर्माचा, ऐक्यधर्माचा, संग्राहक प्रेमधर्माचा विजय असो' असे नाना जयजयकार ! मुलें नाचूं लागलीं. शांतिध्वजा फडकवूं लागली. कृष्णी कार्तिकाला भेटली. वत्सला नागानंदाजवळ भावनांनी ओथंबून उभी होती. नागानंद बांसरी वाजवूं लागले. प्रेमाची बांसरी. लक्षावधि प्रजा प्रेमसंगीतांत डुंबत राहिली. मुलें नाचूं लागलीं.
जनमेजयानें बृहत् भारतीय परिषद् बोलाविली. राजेमहाराजे आले. ऋषिमुनि आले, इंद्र आला. नागनायक आले, नागराजे आले. भव्य दिव्य सभा. लाखों आर्य व नाग जनता जमली होती. जे पूर्वी बंदी होते ते सर्व वस्त्रालंकारांनी अलंकृत असे तेथें शोभत होते. वृध्द सुश्रुता आसनावर होती. मुख्य आसनावर भगवान् आस्तिक होते. त्यांच्या एका पायाशीं जनमेजय होता. दुस-या पायाशीं इंद्र होता. अपूर्व सभा.
आरंभी नागानंदानें बांसरी वाजविली. सर्व सभा एका भावनासिंधूंत डुंबू लागली. सर्वांचा एका वृत्तीत लय झाला. नंतर ऋषींनी शांतिमंत्र म्हटले. मग श्रीआस्तिक बोलावयास उभे राहिले.