लचित बोर्फुकन हे आसाम चे सेना अध्यक्ष होते. सरैघट च्या लढाईत राम सिंहाच्या नेतृत्वाखाली आलेल्या मोघल सेनेला मात देण्यासाठी त्यांना ओळखले जाते. शिवाजी महाराजांप्रमाणेच लचित बोर्फुकन यांनी देखील आसाम प्रांतात मोघल सेनेच्या वाढत्या प्रस्थाला रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले.
या लढायांमध्ये कमकुवत अशा अहोम सेनेने मुघल सेनेचा कच्चा दुवा त्यांचे पायदळ याचा फायदा उठवत चतुर युद्धनीतीचा अवलंब केला आणि मोघल सेनेला मात दिली. लचित बोर्फुकन यांची देशभक्ती याच गोष्टीवरून दिसून येते की सरैघट च्या युद्धात ते आपल्या मामाला मारण्यापासूनही कचरले नाहीत. युद्धाच्या वेळी त्यांनी एका रात्रीत एक मातीची भिंत उभी करण्याचा आदेश दिला आणि आपल्या मामावर त्याची जबाबदारी सोपवली. जेव्हा रात्री ते देखरेख करण्यासाठी तिथे पोचले तेव्हा त्यांना दिसून आले की भिंतीचे काम पाहिजे तसे पुढे सरकलेले नाहीये. याची विचारणा केली असता त्यांच्या मामांनी दमायला झाल्याचा बहाणा केला. हे ऐकून लचित यांना इतका राग आला की "माझे मामा माझ्या आदेशापेक्षा मोठे नाहीत" असे म्हणत त्यांनी तिथेच मामाचे शीर धडावेगळे केले. त्या भिंतीला आजही "मोमोई कोटा गढ" या नावाने ओळखले जाते, ज्याचा अर्थ आहे "ती भिंत जिथे मामांचे शीर उडवण्यात आले."
परंतु सरैघट लढाईच्या नंतर थोड्याच दिवसात अहोम सेनेचा हा महान सेनापती आजारपणामुळे मारला गेला. लचित बर्फुकन चे अवशेष जोरहट पासून १६ किलोमीटर अंतरावरील लचित मदाम इथे ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक वर्षी २४ नोव्हेंबरला आसाम मध्ये लचित दिवस एक राजकीय सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जातो.