गुरु आयोदधौम्य यांच्या एका शिष्याचे नाव होते उपमन्यु. तो फार मोठा गुरुभक्त होता. गुरूंच्या आज्ञेवरून तो रोज गुरे चरायला घेऊन जात असे. एक दिवस गुरूंनी त्याला विचारले की तू इतर विद्यार्थ्यांपेक्षा सुदृढ आणि बलवान दिसत आहेस. तू काय खातोस? तेव्हा उपमन्युने सांगितले की तो भिक्षा मागून अन्न ग्रहण करतो. तेव्हा गुरु त्याला म्हणाले की मला निवेदन केल्याशिवाय तू भिक्षा मागून अन्न ग्रहण करता कामा नये. उपमन्युने आपल्या गुरूंचा म्हणणे मान्य केले.
काही दिवसांनी गुरूंनी पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला की तो गायींचे दूध पिऊन आपली भूक भागवतो. तेव्हा गुरूंनी त्याला तसे करण्यास देखील मनाई केली. परंतु त्यानंतर देखील तो तसाच दिसत राहिल्याने गुरूंनी पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारला. तेव्हा त्याने सांगितले की वासरे गायीचे दूध पिऊन झाल्यावर जो फेस बाहेर काढतात, तो खाऊन तो आपली भूक भागवतो. त्याच्या गुरुनी त्याला तसे करण्यासही मनाई केली.
जेव्हा उपमन्यूच्या समोरचे खाण्या पिण्याचे सर्व मार्ग बंद झाले, तेव्हा एकदा भुकेने व्याकूळ होऊन त्याने एका वनस्पतीची (आकड्याची) पाने खाल्ली. ती पाने विषारी होती. त्यांचे सेवन केल्यामुळे उपमन्यु आंधळा झाला आणि जंगलात भटकू लागला. काहीच दिसत नव्हते तेव्हा चालताना तो एका विहिरीत पडला. जेव्हा उपमन्यु संध्याकाळी उशिरापर्यंत आश्रमात परतून आला नाही तेव्हा गुरु काही शिष्यांना सोबत घेऊन त्याला शोधायला जंगलात गेले. जंगला गेल्यावर गुरूंनी त्याला हाक मारली तेव्हा त्याने ओरडून सांगितले की तो एक विहिरीत पडला आहे. गुरूंनी जेव्हा याचे कारण विचारले तेव्हा त्याने सर्व खरे खरे सांगितले. तेव्हा गुरूंनी उपन्युला देवतांचे वैद्य अश्विनीकुमार यांची स्तुती करायला सांगितले. उपमान्युने तसेच केले. त्याच्या स्तुतीने प्रसन्न होऊन अश्विनीकुमार प्रकट झाले आणि त्यांनी उपमन्युला एक फळ दिले आणि सांगितले की हे खाल्ल्याने तू पुन्हा पूर्ववत होशील. तेव्हा उपमन्यु म्हणाला की माझ्या गुरूंच्या आज्ञेशिवाय मी हे फळ खाऊ शकत नाही.
उपमन्युची गुरुभक्ती बघून अश्विनीकुमार प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला पुन्हा पूर्ववत होण्याचे वरदान दिले, ज्यामुळे त्याची दृष्टी परत आली. गुरूंच्या आशीर्वादाने त्याला सर्व वेद आणि धर्मशास्त्र यांचे ज्ञान प्राप्त झाले.