वसिष्ठ मुनी सूर्यवंशाचे कुलगुरू होते. यांच्याच मार्गदर्शनावरून राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता ज्यामुळे श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला होता. श्रीराम वनवासातून परतल्यावर यांच्याच हस्ते त्याचा राज्याभिषेक झाला आणि रामराज्याची स्थापना संभव झाली. त्यांनी वसिष्ठ पुराण, वसिष्ठ श्राद्ध्कल्प, वसिष्ठ शिक्षा या ग्रंथांची रचना केली.,
ब्रम्हतेजाने हरवले होते विश्वामित्र ला
एकदा राजा विश्वामित्र शिकार करता करता खूप दूर निघून आला. थोडा वेळ आराम करावा म्हणून तो वसिष्ठ मुनींच्या आश्रमात थांबला. इथे त्याने कामधेनु नंदिनी ला पाहिले. नंदिनी गाय पाहून विश्वामित्र वसिष्ठ मुनींना म्हणाला की तुम्ही मला ही गाय द्या, त्याच्या बदल्यात माझ्याकडून काहीही मागा. वसिष्ठ मुनींनी तसे करण्यास नकार दिला.
तेव्हा राजाने नंदिनी गाय बलपूर्वक आपल्या सोबत जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. वसिष्ठ मुनींच्या सांगण्यावरून नंदिनीने क्रोधीत होऊन विश्वामित्र आणि त्याच्या संपूर्ण सैन्याला पळवून लावले. ऋषी वसिष्ठ यांचे हे ब्रम्हतेज बघून राजाला फार आश्चर्य वाटले आणि त्याने आपले राज्य त्यागून तप करण्यास प्रारंभ केला.