'की त्या साधूबोवानं मला या दोन्ही वस्तू दिल्या आहेत. मी चोरल्या नाहीत, परंतु त्याच्या सांगण्यावर आमचा विश्वास बसेना. आता तुम्हीच सांगत आहा तर सोडतो याला; परंतु साधुमहाराज, जग काही फार चांगलं नाही.'
'ते चांगलं केलं पाहिजे. त्याला प्रेम हाच मार्ग.' साधू म्हणाला.
पोलिस निघून गेले. तो चोर तेथे उभा होता. त्याची मान खाली झाली होती. त्याच्या डोळयांतून पाणी येत होते.
'गडया, हे पाणी तात्पुरत्या पश्चात्तापाचं न होता खर्या शेवटच्या पश्चात्तापाचं असू दे. तुझा आत्मा आज मी वाचवला आहे. पुन्हा तो मलिन होऊ देऊ नको. समजलास ना? तुझ्यासाठी काल रात्री प्रार्थना केली. पुन्हाही करीन.'
असे म्हणून साधूने त्याच्या पाठीवरून हात फिरविला. तो चोर ते दिवा-ताट परत देऊ लागला. 'नकोत ती. खरंच मी तुला दिली आहेत. जा आता. तुझं नाव काय?' साधूने विचारले.
'वालजी' असे तो थरथरणारा चोर म्हणाला. साधू कामाला गेला. ताई घरात गेली. वालजीही कृतज्ञतेने ओथंबून निघून गेला.