'अरे, त्या तुरुंगातील पोलिस आले आहेत. ते तुला ओळखतात. ते पोलिस का खोटे? त्या तुरुंगातील हे कैदीही साक्षीदार म्हणून आले आहेत. ते म्हणतात की हा आमच्याबरोबर होता. आम्ही एकत्र चक्की ओढली. फत्तर फोडले. हे कैदीही का खोटे? तुझ्याविरुध्द भरपूर पुरावा आहे. माझा नाइलाज आहे. तुरुंगातून पळून आलास. पूर्वीच्या शिक्षेच्या दुप्पट शिक्षा तुला दिली पाहिजे!' न्यायाधीश म्हणाले

'कोणती पूर्वीची शिक्षा?' आरोपीने विचारले.


'अरे, तू बारा वर्षांपूर्वी तुरुंगात होतास, त्या वेळची. इतकं विसरून गेलास का? चांगलीच बतावणी करतोस तू!' न्यायाधीश हसून म्हणाले.

'मी नव्हतो हो तुरुंगात. का माझ्यावर कुभांड रचता? बालंट घेता? जगात न्यायच नाही का? हे माझे पांढरे  होणारे केस का खोटं बोलतील?' आरोपी म्हणाला.


'पुरे कर वटवट. तुझ्यावर आरोप सिध्द झाला आहे. आता मी निकाल सांगतो,' न्यायाधिशांनी कठोर आवाजात बजावले.
काय होणार निकाल? लोक अधीर होते ऐकायला; परंतु इतक्यात चमत्कार झाला. तो आलेला उदार पुरुष न्यायधिशांच्या कानात काही बोलला.

'हे थोर गृहस्थ आले आहेत. या खटल्यावर ते काही प्रकाश पाडू पाहतात. त्यासाठी ते मुद्दाम दौडत आले. सत्यासाठी किती ही तळमळ. त्यांचं म्हणणं ऐकू या,' असे न्यायाधिशांनी सांगितले.

उदार पुरुष उभा राहिला. सर्वांनी त्याला प्रणाम केला. तो बोलू लागला, 'न्यायाधीशमहाराज, इतर सर्व अधिकारी, आरोपी व फिर्यादी आणि इतर बंधूंनो, वर्तमानपत्रात या खटल्याची हकीगत मी वाचली. ती वाचून मी चकित झालो. सत्यासाठी येथे धावत आलो. एका निरपराधी माणसास वर्षांनुवर्षे तुरुंगाच्या नरकात खितपत पडावं लागू नये म्हणून मी आलो. पोलिसांचा धंदा मोठा चमत्कारिक असतो. एखाद्या गोष्टीचा जर त्यांना तपास लावता आला नाही तर त्यांना आपली अब्रू गेली असं वाटतं. आपली अब्रू सांभाळण्यासाठी, आपलं कौशल्य व शिताफी दाखविण्यासाठी दुसर्‍याची अब्रू घ्यायला ते मागंपुढं पाहात नाहीत. ते वाटेल तो पुरावा तयार करतात. नवी सृष्टी उभारतात आणि सरकारही पुष्कळ वेळा पोलिसांच्या बाजूला उभं राहातं.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel