गौतम बुद्ध त्या स्थानी जाऊन तप करु अत्यंत उग्र अशी तपश्चर्या त्यांनी आरंभली. ज्याप्रमाणे ओल्या काष्ठांच्या घर्षणातून अग्नी प्रकट होत नाही, त्यासाठी वाळलेल्या काष्ठांची आवश्यकता असते, त्याप्रमाणे ज्ञानाचा उदय होण्यासाठीही वासना, विकार शांत झालेले असले पाहिजेत, असे मनात येऊन बुद्धांनी कठिण असे अनशन व्रत आरंभिले. योनमार्ग, ध्यानधारणा यांचेही ते आचरण करु लागले. अति निष्ठुर देहदंडना त्यांनी आरंभिली. त्यांचे शरीर दुबळे झाले. मनोबुबद्धिला ग्लानी आली. कधी कधी तर आपण मरणार असेही त्यांना वाटे. परंतु इतके झाले तरीही जीवनाच्या प्रश्नावर थोडासाही प्रकाश पडलेला त्यांना दिसला नाही. शेवटी उपासतापास हा ज्ञानप्रकाशाचा मार्ग नव्हे, अशी मनाशी पक्की खूणगाठ त्यांनी बांधिली. दुसरा मार्ग शोधण्याचा ते विचार करु लागले. पूर्वी तरुण असताना आध्यात्मिक चिंतनाचा त्यांना एक अनुभव आला होता. त्याच दिशेने जाण्याचे त्यांनी ठरवले. मनाच्या अशा अस्थिर व अशांत स्थितीत असतानाच मार वगैरे षड्रिपूंनी बुद्धांवर हल्ला चढविला अशी दंतकथा आहे. मोह पाडणा-या या माराने बुद्धांनी निश्चयापासून परावृत्त व्हावे म्हणून नाना प्रयत्न केले. कधी अक्राळविक्राळ स्वरुपे त्यांच्याभोवती दाखविली, तर कधी मनाला भूल पाडणारी, उल्लू करणारी अशी मोहक दृश्ये दाखविली. या दंतकथांचा अर्थ इतकाच, की या काळात बुद्धांचे मन शांत नव्हते. एक अखंड अशी ध्यानधारा स्त्रवत नव्हती. ध्यानात मनोव्यत्यय येत होते. या वेळेस त्यांच्या हृदयात एक प्रकारचा झगडा चालू होता आणि अशा झगड्यांनीच त्यांनी शेवटी जुन्या कल्पना भिरकावून दिल्या. जुने मार्ग न जुन्या पद्धती सोडून ते नवीन मार्ग शोधू लागले. जुनी श्रद्धा जाऊन ते नवीन श्रद्धा पाहू लागले. ते मननात मग्न झाले. ध्यानात रंगले. ध्यानाच्या चार स्थितींतून गेल्यावर विशुद्ध अशी आत्मप्राप्ती त्यांना झाली. मनाची समता त्यांना लाभली. हे सारे विश्व ऋतसत्याच्या काही शाश्वत नियमांनुसार चालला आहे असे त्यांना स्पष्टपणे दिसून आले. या जगात सर्वत्र धडपड आहे, धावपळ आहे, कोणी सुखी, कोणी दु:खी, कोणी उच्च, तर कोणी नीच; हे कोट्यवधी  प्राणी जीवनाच्या अनेक अवस्थांतून सारखे जात आहेत. सारखे स्थित्यंतर, सारखा बदल असे विराट विश्वदर्शन त्यांना झाले. आणि एके दिवशीची ती शेवटची ध्यानरात्र! पहाटेची वेळ होत आली आणि ‘सारे अज्ञान नष्ट झाले. ज्ञानप्रभा फाकली.... मी तेथे निश्चयाने, उत्कट वृत्तीने, अखंड प्रयत्नशील असा बसलो होतो.’ असे त्यांचे धन्योद्गार आहेत. गौतमांना बोधी प्राप्त झाली. ज्ञान प्राप्त झाले. गौतम आता ‘बुद्ध’ म्हणजे ज्याला सारे समजले आहे, ज्याच्या सर्व आशंका फिटल्या आहेत असे झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel