बुद्धांच्या शिकवणीचे आजकाल फार महत्त्व आहे. यात शंका नाही. परंतु बुद्ध ज्या काळात वावरले, त्या काळातील परिस्थिती जर आपण नीटपणे समजून घेतली नाही, तर त्यांची शिकवण समजण्याची आशा नाही. आणि ह्यासाठी आपणाजवळ ऐतिहासिक कल्पनाशक्ती हवी. आणि ती असणे सोपी गोष्ट नाही. बुद्धांनी स्वत:च्या आयुष्यात साध्या शब्दांनी उपदेश केला. ते सोप्या गोष्टी सांगत, साधे विचार सांगत. परंतु नंतरच्या काळात अनेक वादविवाद त्यांच्या साध्या शिकवणीत घुसले. सहाजिकच मग बुद्धांच्या उद्गारांकडे पाहतानाही नंतर जी अनेक तत्त्वे व मते त्यांत घुसली व जी आपल्याही डोक्यांत असतात, त्यांचेही प्रतिबिंब त्यात पाहण्याची वृत्ती होते. जो जो थोर विचार असतो, मग तो धार्मिक असो वा तात्त्विक असो, त्यात अनेक अर्थ प्रसवण्याची शक्ती असते. ते अर्थ त्या त्या विचारस्त्राष्टयांच्या मनात असतात की नाही, देव जाणे. नंतरची अर्थविवरणे दूर करुन बुद्धांकडे ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील एक महान विचारस्रष्टा या नात्याने पाहणे, त्या काळात सर्वत्र उपदेश देत संचार करणारी बुद्धांची ती सजीव मूर्ती डोळ्यांसमोर आणणे ही गोष्ट कठीण आहे, जरा नाजूक अशी आहे. हे पुनर्रचनेचे कार्य कधीही पुरे होणार नाही हे स्पष्ट आहे. परंतु आपण प्रयत्न करु तर ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकाच्या एक सर्वसाधारण असे चित्र डोळ्यांसमोर उभे करु शकू. त्या चित्राची बाह्य रुपरेषाच अधिक यथार्थ असणे शक्य आहे. कल्पनेने ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात आपण जाऊ या. काय बरे आपणास दिसते? त्या काळी हिंदुस्थानात विचारांचे शेकडो प्रवाह होते. नाना आचार, नाना रुढी; नाना श्रद्धा, नाना विश्वास; पशुपक्षांची पूजा, जादूटोणा, मंत्रतंत्र, असे अनेक प्रकार होते. परंतु या सर्वांचा मिळून एक महान प्रवाह होऊन तो अद्वैतवादाकडे जात होता. सत्य शोधून त्या सत्याशी नीट संबंध जोडणे हा जो मानवी प्रयत्न तो नेहमी बहुधा द्वैतातच, अनेकतेतच परिणत होतो. हिंदुस्थानातही असे द्वैतवादी विचार त्या काळात होते. परंतु काही महत्त्वाच्या गोष्टींत या सर्व भिन्न दर्शनांचा एकवाक्यता होती. प्राणी जन्मला तेव्हाच त्याचे जीवन सुरु झाले, किंवा तो मेला म्हणजे त्याचे जीवन सुरु झाले, किंवा तो मेला म्हणजे त्याचे जीवन संपले असे नाही. अनंत जन्मांच्या साखळीतील हा जन्म एक दुवा आहे; प्रत्येक नवीन जन्म पूर्वीच्या जन्मावरून निश्चित होत असतो; पूर्वीच्या जन्मातील कृत्यांचा ठसा व परिणाम आजच्या जन्मावर होत असतो. पशू, मानव, देव हे सारे आकार त्या साखळीतील दुवे आहेत. सत्कर्मांनी आपण स्वत:ला उन्नत करीत असतो, आपण स्वर्ग मिळवितो; दुष्कृत्यांनी आपण अध:पतित होत असतो. ज्या अर्थी सर्व प्राण्यांना मरण आहे; त्या अर्थी खरे सुख स्वर्गात वा पृथ्वीवर शोधण्यात अर्थ नाही. जन्ममरणाच्या फे-यातून सुटणे हे धर्ममय पुरुषाचे ध्येय असते; यालात मोक्ष म्हणतात, ब्रह्मैक्य म्हणतात, निर्वाण म्हणतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel