विश्वात्मा प्रकट व्हावा म्हणून सारी बंधने, सारे पडदे दूर केले पाहिजेत. त्यासाठी सतत प्रयत्नपूर्वक नैतिक अभ्यास हवा. उपनिषदे म्हणतात, की ज्ञानाने मनुष्य मुक्त होतो. बुद्ध म्हणतात, की ज्याने सर्व इच्छांचा त्याग केला, ज्याने वासना जय केला, तो सुखी होतो. ज्याने जीवन विषयवासनेने बरबटले आहे, भीतीने व द्वेषाने अंध झालेले आहे, क्रोधाने व नीचतेने मलिन झालेले आहे, त्याला ते आत्मदर्शन नाही. त्याला तो ब्रह्मानंद मिळत नाही. बुद्ध ध्येयापेक्षा ध्येयाकडे नेणा-या मार्गावर अधिक जोर देतात. विश्वात्मक स्वरुपाची सत्यता बुद्ध सूचित करतात. हा जो विश्वत्मा, परमात्मा, त्याचा या बदलत्या नामरुपात्मक संघताशी गोंधळ मात्र करु नये.
बुद्धांच्या काळात जे विचार होते, त्यातूनच त्यांनी निर्वाणाची कल्पना घेतली. निर्वाण म्हणजे आनंदमय असे अंतिम ध्येय. त्या ध्येयासाठी सर्वांनी प्रयत्न करावा हा बुद्धांचा विचार उपनिषदांतील मोक्षाच्या विचाराशी समान असा आहे. उपनिषदात व भगवद्गीतेत निर्वाण शब्द आला आहे. निर्वाण म्हणजे वासनांचा क्षय, ब्रह्माशी ऐक्य. निर्वाण म्हणजे केवळ नाश नव्हे; केवळ अभाव, केवळ शून्यता नव्हे. निर्वाण म्हणजे वासना-विकारांची आग शांत होणे, विझून जाणे; निर्वाण म्हणजे परिपूर्णतेशी आनंदमय ऐक्य अनुभवणे. निर्वाण-प्राप्ती झाली, की कार्यकारणभावाची साखळी तुटते. मग जन्म मरण नाही. ब्रह्मप्राप्ती, ब्रह्मभूत हे शब्द परमोच्च दशा दर्शविण्यासाठी म्हणून बुद्ध वापरतात. ही परमधन्य दशा या जन्मातही प्राप्त करुन घेता येते, शरीर पडण्यापूर्वी मिळविता येते. ज्या निर्वाणात जन्म नाही, जरा नाही, आजारपण नाही, मरण नाही; ज्या निर्वाणात दु:ख नाही, मलिनता नाही, असे ते निर्वाण आपण स्वत: कसे मिळविले, ते बुद्धांनी वर्णिले आहे. विशाख नावाच्या एका मनुष्याने जेव्हा भिक्षुणी धम्मदिना हिला निर्वाण म्हणजे काय असा प्रश्न केला, तेव्हा ती म्हणाली, “विशाख, तू फारच पुढचे प्रश्न विचारतोस. अरे, सर्व धार्मिक जीवनाची निर्वाण हा हेतू आहे. सर्व धर्ममय जीवनाची इतिकर्तव्यता म्हणजे हे निर्वाण. हे धर्ममय जीवन शेवटी निर्वाणसिंधूत जाऊन मिसळते ते निर्वाण समजून घेण्याची तुला इच्छाच असेल, तर तू स्वत:च बुद्धदेवांकडे जाऊन त्यांनाच विचार. ते जे काही तुला सांगतील ते नीट ऐक.” विशाख बुद्धदेवांकडे गेला. बुद्ध त्याला म्हणाले, “भिक्षुणी धम्मदिना विदुषी आहे; परिणत प्रज्ञा आहे; तिने तुला सांगितले तेच मीही तुला सांगितले असते. तिने उत्तर दिले तेच बरोबर आहे. तेच लक्षात ठेव.” आपण याच जन्मात दु:खाचा शेवट करु शकू. मरणोत्तर स्थितीची अभिवचने देण्यात बुद्धांना समाधान नाही. या जन्मातच ते दिव्यदर्शन होऊ शकते अशी बुद्ध ग्वाही देतात.