गोप्या आत कोंडण्यात आले. सातीजण आनंदात होती. रात्रभर क्रांतीची गाणी ती गात होती आणि रात्र संपली. सहाचे ठोके पडले. पूर्वेकडे तांबडे फुटू लागले. त्या सातांना नेण्यासाठी शिपाई आले. खोलीचे कुलूप उघडले गेले. त्यांना नेऊन रांगेत उभे करण्यात आले. प्रत्येकासमोर एक खणती ठेवण्यात आली.
'सहा फूट लांब नि चार फूट रूंद खळगा खणा.'
'परंतु खोल किती?' गोप्याने विचारले.
'तुमचे देह आत नीट मावतील इतके खोल.'
सातीजणांनी खळगे खणले. खळग्याच्या तोंडाशी ते स्वातंत्र्यवीर उभे राहिले. फडाड-एकजण पडला. फडाड्फड् - दुसरा. अशा रीतीने सहा माणसे पडली. सहाव्याला गोळी लागताच नि तो पडताच, सातव्या गोप्या होता तोही पटकन पडला.'
'अरे, तू उठ. तू कसा पडलास?
'मला चुकून गोळी लागली असे तुम्हाला वाटून, द्याल वर माती ढकलून, असे वाटले. मातीतून उठून पुन्हा उभा राहिलो असतो. वनवासी राम झालो असतो. शेवटच्या क्रांतीची तयारी केली असती.'
'वटवट पुरे.'
गोप्या शांतपणे उभा राहिला. गोळया सुटल्या ...... 'महात्मा गांधी की जय !' तो म्हणाला.
त्या साती देहांवर माती ढकलण्यात आली.
लष्करी कोर्टाने भराभर सर्वांचे निकाल लावले. शेकडोना फटक्याच्या शिक्षा झाल्या. वास्तविक हे सारे स्वातंत्र्ययुध्दातील कैदी होते. त्याना त्याप्रमाणे वागविले पाहिजे होते. परंतु त्यांना फटक्यांची शिक्षा देण्यात आली! सुधारलेली सरकारे - परंतु साधी माणुसकीही त्यांना नाही. अनेकांना दहा-दहा वीस-वीस वर्षांच्या सजा झाल्या. तुरूंगात ते खितपत पडले आहेत. परंतु मनाने मस्त आहेत.
देशांतील क्रांती शमल्यासारखी झाली. ती लष्करी कोर्ट गेली. ते तात्पुरते तुरूंग नाहीसे झाले. पुन्हा पूर्ववत गुलामगिरी सर्वत्र चालू झाली.
ते सात वीर तेथे पडलेले आहेत. वारे त्यांना गाणी म्हणतात. दवबिंदू त्यांची अश्रूनी पूजा करतात. आजूबाजूची झाडे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतात. येथील अणुरेणू जणू स्वातंत्र्याची गाणी गातो. उद्या तेथे स्वातंत्र्यमंदीर बांधले जाईल. लाखो लोकांना ते स्थान म्हणजे तीर्थक्षेत्र होईल. स्वातंत्र्याची अमर स्फूर्ती गोप्या नि त्याचे साथीदार ...... ते स्वातंत्र्यवीर देतील. उद्या शाहीर त्यांचे पोवाडे लिहीतील. कादंबरीकार कादंब-या लिहितील ..... इतिहासकार नवा इतिहास लिहितील.
९ ऑगस्टच्या भारतीय क्रांतीने रक्ताचा नि अश्रूंचा इतका मालमसाला हिंदी राष्ट्राला दिला आहे की तो शतकानुशतके पुरेल व स्फूर्ती देईल. वंदे मातरम्!