श्री मुक्तेश्वर महादेवाचा महिमा मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जातो. स्वयं तेजस्वी जितेंद्रिय ब्राम्हण देखील १३ वर्ष तप केल्यानंतर महाकाल वनात येऊनच मोक्षाचा मार्ग प्राप्त करू शकला होता. पौराणिक कथांनुसार प्राचीन काळी एक मुक्ती नावाचा जितेंद्रिय ब्राम्हण होता. मुक्तीच्या इच्छेने तो सतत तपश्चर्या करण्यात लीन असे. असेच तप करत १३ वर्षे गेली. मग एक दिवस तो महाकाल वनात असलेल्या अतिशय पवित्र अशा क्षिप्रा नदीत स्नान करण्यासाठी गेला. क्षिप्रा नदीत त्याने स्नान केले आणि मग तिथेच तटावर बसून तप करण्यास प्रारंभ केला. तेव्हा त्याने तिथे एका प्रचंड आणि भीषण देहाच्या मनुष्याला येताना पहिले. त्याच्या हातात धनुष्य बाण होते. तिथे पोचल्यावर तो मनुष्य ब्राम्हणाला म्हणाला की मी तुला मारायला आलो आहे. त्याचे बोलणे ऐकून बेम्हन अतिशय घाबरला आणि भगवान नारायणाचे स्मरण करत ध्यान लावून बसला. ब्राम्हणाच्या तपाच्या भव्य प्रतापाने त्या मनुष्याने धनुष्य बाण खाली टाकले आणि ब्राम्हणाला म्हणाला, महाराज तुमच्या तपाच्या प्रभावाने माझी बुद्धी निर्मळ झाली आहे. मी आतापर्यंत खूप दुष्कर्म केली आहेत, परंतु आता मला तुमच्यासोबत राहून तप करून मुक्ती प्राप्त करायची आहे. ब्राम्हणाच्या परवानगीची वाट न पाहताच तो मनुष्य तिथे बसून देवाचे ध्यान करू लागला. त्याच्या तपाचे फळ म्हणून त्याला मुक्ती मिळाली. हे पाहून ब्राम्हणाला आश्चर्य वाटले की मी इतकी वर्षे ध्यान करतो आहे आणि मला मात्र मुक्ती मिळाली नाही. असा विचार करून ब्राम्हण नदीच्या पाण्यात मधोमध जाऊन तप करू लागला.