- ४ -
मूसा आतां धनगर बनला. वाळवंटाच्या कडेला असलेल्या ओसाड भागांत, डोंगर-पहाडांत तो राहीं. त्याच्या शिक्षणांतील नवीन प्रकरण जणुं सुरू झालें. विद्यापीठांतील धुळीनें भरलेलीं ती हस्तलिखितें सोडून तो बाहेर पडला. मृतांच्या छायामय जीविताविषयींच्या कल्पना व कथा सोडून तो बाहेर पडला. आतां रात्रीच्या वेळेस तो आकाशांतील तारे बघे. ईश्वराची ती जळजळीत तेजोमयी लिपि आकाशपटावर तो पाही. इजिप्शियन लोक गाय, कुत्रा वगैरेंनाहि देव मानीत. मूसानें ईश्वराविषयींच्या या सार्या पोरकट कल्पना आपल्या मनांतून काढून टाकल्या. तो निराळा नवा देव शोधूं लागला. अधिक उदात्त, भव्य व दिव्य असा परमेश्वर तो पाहूं लागला. वाळवंटांत उठणार्या वादळांवर स्वार झालेला असा परमेश्वर कधीं त्याला दिसे. मेघांच्या गर्जनेंत, विजांच्या कडकडाटांत त्या प्रभूचा आवाज त्याला ऐकूं येई ; आणि सकाळीं सूर्याचे किरण येत, वाळवंटांतील झुडपांवर ते किरण पडत ; आणि तीं झुडपें जणूं पेटल्याप्रमाणें दिसत. त्या प्रदीप्त झुडपांत प्रभूचें मुखमंडल जणूं तो प्रत्यक्ष समोर पाही.
मूसाला नवीन परमेश्वर सांपडला. त्या वाळवंटांत त्याला नवा देव मिळाला. हा परमेश्वर भयंकर होता. ओसाड रानावनांत सांपडलेला तो परमेश्वर होता. अरबी लोकांच्या परमेश्वराप्रमाणें कठोर व उग्र असा हा प्रभु होता. पर्वतांवरून उड्डाण करणारा, वाळवंटांतून पार जाणारा, भव्य भडक अशा तंबूंत राहणारा असा हा परमेश्वर होता. लोक झोंपलें असतां त्यांना तो सांभाळतो ; त्यांना युध्दांत घेऊन जातो ; निर्दयपणें आपल्या लोकांच्या शत्रुचा नि:पात करतो ; वार्याप्रमाणें स्वत:चें मन बदलतो ; मनांत येईल तसें करतो ; अपमानाचा पट्कन् सुड घेतो ; खोटें सांगून हेतुसिध्दि होत असेल तर हा देव खोटें बोलायलाहि मागें पुढें पहात नाहीं. हा असा देव आहे, कीं अन्याय ज्याला हसन होत नाहीं ; परकीयांविषयींहि तो उदारता दाखवितो ; पोरक्या पोरांचा तो प्रेमळ पिता बनतो ; गरिबांवर दया करतो. अरबस्तानांतील बडौनमध्यें जे जे गुण व दुर्गुण आहेत ते थोडक्यांत या देवाच्या ठायीं आहेत. जणूं मूसानें आरशांत पाहिले आणि स्वत:च्याच स्वरूपांत त्याला परमेश्वर आढळला. मूसानें जिहोवाचें जें चित्र रंगविलें आहे तें त्याचेच स्वत:चेंच अनंत पटीनें वाढवलेलें असें चित्र आहे.
- ५ -
मूसा पुष्कळ वर्षे वाळवंटांतच राहिला. वाळवंटांतील ती अनंत शांति त्याला आवडे. त्या गंभीर शांतीनें मूसाचे विचार वाढले. विचारांचा विकास व्हायला अवसर मिळाला. वाळवंटांतील अपार शांति, येथील तें नि:स्तब्ध अनंत आकाश यांच्या संगतींत त्याच्या गूढ स्वभावाला, त्याच्या चिंतनशील मनाला भरपूर खाद्य मिळालें. एक सुखवस्तु बेडौन सरदाराच्या मुलीशीं त्यानें लग्न लाविलें आणि चिंतनशील शांत जीवन तो कंठूं लागला.