डोळयात खोटे अश्रू आणून ती म्हणाली, 'पूर्वी माझा नवरा माझ्यावर प्रेम करी; परंतु आत ते मजजवळ गोड बोलत नाहीत, मला पाहून हसत नाहीत. मी आता डोळयांसमोरही त्यांना नकोशी झाले आहे. काय करावे? पतिप्रेम नसेल तर बायकांना जिणे नको वाटते. जाऊ दे मला, घेऊ दे उडी.’
साधू म्हणाला, 'हे नवरे सारे स्वत: का मदनाचे पुतळे असतात? स्वत: असतात कुरूप परंतु बायको मात्र पाहिजे अप्सरा आणि तुमचे रूप् काही तसे वाईट नाही. बरे ते असो. जीव काही देऊ नका. या पाण्यात देवाचे नाव घेऊन तीनदा बुचकळी मारा. म्हणजे आहे हयापेक्षाही तुमचे सौंदर्य अधिक होईल.
असे सांगून साधू निघून गेला. तिने त्याला नमस्कारही केला नाही. पाण्यात एक बुचकळी मारून ती वर आली तर खरेच पूर्वीपेक्षा ती अधिक सुंदर दिसू लागली. मग तिले दुसरी बुचकळी मारली. तो आणखीच सुंदर झाली. तिने तिसरी बुचकळी मारली. ती आता केवळ सौंदर्याची खाण अशी दिसू लागली. तिच्या मनात असे आले की आणखी एक बुचकळी मारावी. तिने चौथी बुचकळी मारली. तो काय आश्चर्य! तिचे सारे रूपलावण्य नाहीसे झाले. तिचे शरीर कोळशासारखे काळे काळे झाले. नाक नकटे झाले. डोळे बटबटीत दिसू लागले. ती रडू लागली. रडत रडत त्या साधूच्या झोपडीजवळ ती आली. तो साधू बाहेर आला. पाया पडून ती म्हणाली, 'महाराज, क्षमा करा. तुम्ही तीन बुचकळया मारायला सांगितले, परंतु मी चौथी मारली. माझे सारे रूप गेले. येऊ दे पुन्हा माझे रूप, करा एवढी कृपा. '
साधू म्हणाला, 'ती शक्ती मला नाही. 'अतिलोभो न कर्तव्य:' हे खरे आहे. अती तेथे माती आणि शिवाय माझ्या शब्दांवर विश्वास ठेवलात नाही. मला एक प्रकारे फसवलंत तुम्ही. जा आता. भोगा कृतकर्माची फळे. '
ती नवीन नावडती मरायला थोडीच आली होती! मरण्याचे तिला धैर्य नव्हते. रडत रडत ती परत निघाली. 'मारतील दोन लाथा परंतु खायला तर देतील' असे मनात म्हणत होती. वाटेत तिला कोणी हाक मारली नाही. ना करंडा ना करंडी, ना गाठोडे ना काही. हात हलवीत परत आली. काळीकुंद्री होऊन मात्र आली.
घरी येऊन दारी उभी राहिली. तिला कोणी ओळखीना; परंतु मग डोळयांत पाणी आणून म्हणाली, 'बाई, मला ओळखलंत नाही का? मी ती पूर्वीची तुम्हाला छळणारी आवडती. पुन्हा आवडती होण्यासाठी म्हणून रानात गेले. परंतु तीनदा बुडी मारून पुन्हा अती लोभाने चौथ्यांदा मारली. त्याचे हे फळ. माझे सारे रूपलावण्य गेले. मी ही अशी झाले. मला क्षमा करा सर्वांनी. येथे मला राहू दे. '
ती नवीन आवडती म्हणाली, 'राहा हो बाई. हे तुमचे माझे दोघींचे घर. तुम्ही मला छळलंत, परंतु मी तुम्हाला छळणार नाही. ज्या दु:खातून मी गेले ते तुम्हाला भोगू देणार नाही. झाले ते झाले. उगी. रडू नका, पुसा डोळे. आपण दोघी सुखाने नांदू. '
आणि खरोखरच त्या सुखाने नांदू लागल्या.
इटकुली मिटकुली गोष्ट ऐकणारांचे अभीष्ट.