भिकंटन लगबगीने गेले. नदीवर पोचले व आंघोळ करू लागले. इकडे त्या वाण्याच्या मनात आले की हा ब्राह्मण एवढयाशा मडक्याला इतका काय म्हणून जपतो. त्या मडक्यात काय आहे ते पाहाण्याचे त्याने ठरविले. त्याने मडक्यात डोकावून पाहिले तो काही दिसेना. ते मडके हलवावे असे त्याला वाटले. त्याने ते हातात घेऊन सहज 'पड पड' असे म्हटले. तो काय आश्चर्य? आतून गरम गरम डाळेमुरमुरे यांची रास पडू लागली. त्याला आनंद झाला. त्याने आपल्या बायकोला हाक मारली व तो तिला म्हणाला, 'हे बघ, हे मडके घरात ठेव व घरातील अगदी असेच एक मडके बाहेर आणून ठेव. 'बायकोने त्याप्रमाणे केले. वाणीदादा जणू काही झालेच नाही अशा साळसूदपणे तेथे बसला होता.

भिकंभट आंघोळ करून आले. 'वाणीदादा, माझे मडके आहे ना रे?' त्यांनी विचारले. वाणीदादा म्हणाला, 'अहो मडक्याला कोण लावील हात? तो का सोन्याचा हंडा आहे की कोणी चोरील बिरील? ते आहे तेथे मडके. जा एकदाचे घेऊन.

भिकंभट मडके घेऊन निघाले. मनात मनोराज्ये करीत ते चालत होते. मी आता श्रीमंत होईन. माडया-महाल बांधीन, बागबगीचे करीन, असे मनात म्हणत चालले होते. रस्ता कसा संपला ते कळलेही नाही; गावची नदी आली तेव्हा आपले घर जवळ आले असे त्यांच्या ध्यानात आले. आले लगबगीने घरी. त्यांनी दारावर थाप मारली. सावित्रीबाईंनी दार उघडले तो दारात पतीची स्वारी!

'आलेत ना परत! मी केलेच होते मुळी भाकित. एक दिवस जाल. दोन दिवस जाल. शेवटी हात हलवीत परत याल -' सावित्रीबाई म्हणाल्या

'हात हलवीत परत आलो नाही. हे पहा मडके आणले आहे. 'भिकंभट म्हणाले.

'मडके आणले आहे! घरात का थोडी मडकी आहेत?' सावित्रीबाई वेडावीत म्हणाल्या.

भिकभट म्हणाले, 'तुम्हा बायकांचा फारच उतावळा व अधीर स्वभाव, जरा नीट ऐकून तर घेशील की नाही? आलो नाही तो तुझी तोफ आपली सुरू, जरा धीराने घे.'

सावित्रीबाई उसळून म्हणाली, 'आज दहा वर्षे तुमच्याबरोबर संसार केला तो का धीर असल्यावाचून? पोराबाळांना खायला देता येत नाही. थंडीवार्‍याला अंगावर पांघरूण घालता येत नाही. तरी मी सारे मुकाटयाने बघते, सहन करते. म्हणे धीर नाही! लक्षात ठेवा, तुम्हा पुरूषांपेक्षा आम्ही बायकाच अधिक धीराच्या असतो, खंबीर असतो, सोशिक असतो. अगस्ती ऋषी सात समुद्र प्यायला. आम्ही बायका अपमान, दु:ख, कष्ट, हाल, अपेष्टा यांचे शेकडो समुद्र पीत असतो. म्हणे धीर नाही. धीर नसता तर केव्हाच जीव दिला असता!'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel