तो गोसावी तेथे थांबला. जवळच एक घर होते. त्या घराकडे बोट करून गोसावी म्हणाला, 'बेटा, हे तुझे घर. तू ह्या घरात राहात जा. या जंगलात वाटेल तिकडे हिंड, फीर. वाटेल त्या झाडाचे फळ खा, वाटेल त्या झर्याचे पाणी पी. येथील झाडांना नेहमी बारा महिने फळे असतात व ती अमृतासारखी गोड असतात. येथील ओढयांना बारा महिने तेरा काळ पाणी असते, ते स्फटिकासारखे स्वच्छ, भिंगाप्रमाणे निर्मळ असते. येथे अनेक फुलझाडे आहेत. त्यांचे हार घाल. मोरांची पिसे सापडतील, त्यांचे मुगुट करून डोक्यात घाल. तुला येथे मोकळीक आहे. या रानाचा तू राजा; परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की उत्तर दिशेला मात्र जावयाचे नाही. तिकडे जाशील तर धोका आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण या दिशांत तुला मोकळीक आहे. मी आता जातो. मी केव्हा येईन त्याचा नेम नाही. तू काळजी करू नकोस. सुखाने राहा. 'असे म्हणून तो गोसावी निघून गेला.
राजपुत्र तेथे एकटाच राहिला. त्याने पोटभर फळे खाल्ली. झर्याचे गोड पाणी प्यायला. फुलांच्या वनमाळा त्याने गळयात घातल्या. त्याने साळुंकीच्या पिलास, सशाच्या पिलास, कुत्रीच्या पिलास खायला दिले. त्यांना बरोबर घेऊन तो हिंडला. शेवटी दमला व त्या घरात जाऊन झोपला.
एके दिवशी त्या राजपुत्राला एक सुंदर हरिण दिसले. त्या हरणाच्या पाठोपाठ तो जाऊ लागला. हरिण उत्तर दिशेला पळू लागले. उत्तर दिशेस जावयाचे नाही ही गोष्ट राजपुत्र विसरला. त्याला जणू भूल पडली. हरणाचा पाठलाग करीत तो चालला; परंतु हरिण एकदम दिसेनासे झाले. तो इकडेतिकडे पाहातो तो हरिण कोठेही नाही. तो चकित झाला. इतक्यात त्याला एका झाडाखाली एक सुंदर स्त्री दिसली. तो तिच्याजवळ गेला व म्हणाला, 'तुम्हाला हरिण दिसले का? किती सुंदर होते! कोठे गेले कोणास माहीत?'
ती म्हणाली, 'मला माहीत नाही. मी येथे बसलेली असते. येणारा जाणारा पाहून खेळायला बोलावते. या. तुम्ही माझ्याबरोबर खेळा. काही तरी पणास लावा. हे पाहा फासे तुमची वाट पाहात आहेत. 'असे म्हणून तिने फासे हातात खुळखुळवले. राजपुत्र स्वाभिमानी होता. त्याने खेळण्याचे ठरविले. दोघेजण खेळू लागली. राजपुत्राने प्रथम सशाचे पिलू लावले, परंतु त्या स्त्रीने ते जिंकून घेतले. राजपुत्रावर हार आली. राजपुत्र पुन्हा खेळू लागला. त्याने ते साळुंकीचे पिलू पणाला लावले. पुन्हा राजपुत्र हरला. तो अधिकच हटटास पेटला. त्याने ते कुत्रीचे पिलू पणाला लावले, तेही त्या स्त्रीने जिंकून घेतले. आता पणाला लावावयास काय उरले? तो राजपुत्र म्हणाला, 'मी सर्वस्व गमावून बसलो. आता खेळ पुरे. 'ती स्त्री म्हणाली, 'आता स्वत:ला पणास लाव. अजून तू शिल्लक आहेस.'
राजपुत्राने स्वत:ला पणास लावले. खेळता खेळता राजपुत्र हरला. त्या स्त्रीने राजपुत्राला जिंकले व त्याला गुलाम केल ती स्त्री म्हणजे एक दुष्ट राक्षसीण होती. ती कपटी व मायावी होती. तिने राजपुत्राला लहान डुक्कर केले. सशाचे पिलू, साळुंकीचे पिलू, कुत्रीचे पिलू व तो डुक्कर झालेला राजपुत्र, चौघांना घेऊन राक्षसीण निघाली. ती आपल्या गुहेत आली व म्हणू लागली की, 'चार दिवस आता चांगली मेजवानी होईल. पहिल्या दिवशी सशाचे पिलू, दुसर्या दिवशी साळुंकी, तिसर्या दिवशी कुत्र्याचे पिलू आणि चौथ्या दिवशी मजा!'