'बम् बम् बम्.'
'बाळ, राजाची मुलगी तुला बायको हवी का?'
'बम् बम् बम्.'
'बाळ माझ्याजवळ मणी आहे तो तुला हवा का?'
'बम् बम् बम्. '
त्या वेषधारी प्रधानपुत्राने तो मणी घेतला व आपल्या कमरेत लपविला. म्हातारीला मुलाची उत्तरे ऐकून आनंद झाला. पुन्हा ती विचारू लागली, 'ती राजकन्या, तुझी भावी पत्नी तुला पहावयाची आहे का?' 'बम् बम् बम्. '
'मग राजवाडयात येतोस का?'
'बम् बम् बम्.'
मुलाची राजवाडयात येण्याची तयारी आहे असे पाहून म्हातारी हर्षली. ती म्हणाली, 'चल माझ्याबरोबर. तू राजाचा जावई होशील. तुला अर्धे राज्य मिळेल. आता वेडेपणा सोडशील ना?'
'बम् बम् बम्.'
म्हातारी त्या वेषधारी प्रधानपुत्राला घेऊन राजवाडयात आली. तिला राजवाडयात जाण्यायेण्यास नेहमी सदर परवानगी होती. तिला मोठा मान होता. ती राजवाडयात गेली व म्हणाली, 'माझा मुलगा आला आहे. त्याला राजकन्या पाहावयाची आहे. त्याचीच ती व्हावयाची आहे. त्याला बघू दे. 'राजकन्या बाहेर आली व खाली मान घालून उभी राहिली. म्हातारी मुलास म्हणाली, 'तुला आवडली ना? 'बम् बम् बम्' तो म्हणाला, म्हातारी पुन्हा म्हणाली, 'आता घरीचल' तो वेषधारी प्रधानपुत्र रागाने 'धूप् धूप् धूप्' म्हणाला.
'मग का येथे राहातोस?'
'बम् बम् बम्,'
'घरी येत नाहीस?'
'धूप् धूप् धूप्. '
शेवटी म्हातारी एकटीच घरी गेली. तो प्रधानपुत्र तेथेच बम् बम् बम्, व धूप् धूप् धूप् म्हणत उभा राहिला. इतक्यात त्याने ती तळयातील मुलगी एका बाजूस रडताना पाहिली. तो एकदम तिच्याकडे धावून गेला व हळूच कानात म्हणाला, 'मी प्रधानाचा मुलगा मी मणी मिळवला आहे. रात्री पळून जाऊ.' इतक्यात शिपाई तेथे आले. 'अरे बेटया, ती नव्हे तुझी बायको. ती तर राजपुत्राची आहे. चल इकडे ये. तो वेषधारी वेडा तिकडे गेला.'