“असं भांडू नये. ती लहान आहे.” साळूबाई म्हणाली.
‘मी वाटतं मोठा आहे?” तो विचारी.
“मला फुलं देशील आणून, रामू? फुलं आणून देणार असलास तर मी हसेन. नाही तर आता रागावून निघून जाईन.” सोनी म्हणे.
“बरं आणीन फुलं. आता हस.” तो म्हणे.
मग सोनी हसे व रामूचे डोळे धरी. अशी गंमत चाले. कधी कधी सोनी साळूबाईकडे जेवे. मग मनूबाबा घरी रागावत.
“रामू वाटतं लोक आहे? रामू आपलाच. रामूची आई आपलीच. त्यांच्याकडे जेवल्ये म्हणून काय झालं हो बाबा? तुम्ही रागावलेत? नको जाऊ?” ती विचारी.
“एखादे वेळेस जावं.” तो म्हणे
“मग मी का रोज जाते?” ती विचारी.
असे दिवस जात होते. मनूबाबा आता सोनीला लिहावाचायला शिकवू लागले. एके दिवशी सोनीसाठी त्यांनी लहानसे पुस्तक आणले. ते तिच्याबरोबर वाचीत होते. तो साळूबाई आली.
“मनूबाबा, तुम्हांला वाचता येतं वाटतं?” तिने आश्चर्याने विचारले.
“मध्यंतरी विसरलो होतो. पंधरा-वीस वर्षांत कधी लिहिलं नाही, कधी वाचल नाही. परंतु आता सारं आठवतं. सोनीला शिकविता यावं म्हणून माझं शिकणं मला परत मिळालं, खरं ना सोने? आम्हांला लहानपणी शिकवताना मारीत. परंतु सोनीला नाही हो मी मारीत. सोनी शहाणी आहे. भराभर येतं तिला.” मनूबाबा सांगू लागले.
“रामूसुद्धा चांगलं वाचतो. बाकी गरिबांना फार शिकून काय करायचं म्हणा. परंतु लिहिता वाचता आलं पाहिजे. म्हणजे पत्र लिहिता येतं, आलेल पत्र वाचता येतं. हिशेब करता येतो. नाही तर गरिबांना फसवतात. मला नाही वाचता येत. रामू माझ्या पाठीस लागतो. परंतु मी त्याला म्हणते. ‘मला नको रे आता शिकवू.’ तुझी बायको आली म्हणजे पुढं तिला तू शिकव.” साळूबाई हसून म्हणाली.