तुला आठवते का ती गोष्ट? पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. मनूबाबांच्या झोपडीजवळ एक आनाथ स्त्री मेलेली आढळली. इंदू, तीच माझी पहिली पत्नी आणि मनूबाबाकडे वाढणारी सोनी तीच माझी मुलगी. ती माझी पत्नी गावाच्या सीमेवर विष पिऊन मरून पडली. पतीची बेअब्रू करण्यापेक्षा जगातून गेलेलं काय वाईट? माझ्यामुळं पतीच्या नावाला कमीपणा का येईल? तर मग मी या जगात कशाला राहू? अशा विचारानं का तिनं मरण पत्करलं? आणि ती मुलगी! त्या विणकराला म्हटलं, का मी त्या अनाथ मुलीला वाढवीन. परंतु तो देईना. ही माझी मुलगी आहे व ही मरून पडलेली अनाथ स्त्री माझी पत्नी आहे असं सर्व लोकांसमोर कबूल करण्याचं धैर्य मला झालं नाही. इंदू, असा मी आहे. तुझ्यापासून पंधरा वर्षे सत्य लपवून ठेवलं. परंतु आज सांगत आहे. या पापी पतीला क्षमा कर. तुझ्या प्रेमात आहे का इतकी शक्ती, इंदू!” असे म्हणून पतीने आपले डोके वाकविले.
इंदू थरथरत होती. ती हकीगत ऐकताच क्षणोक्षणी तिची मुद्रा बदलत होती. परंतु शेवटी तिच्या डोळ्यांतून करूणा चमकली. तिने पतीच्या मस्तकावरून हात फिरविला. दोघे पुन्हा शांत बसली. कोणी बोलेना.
“इंदू, तू माझ्याकडे प्रेमानं अत:पर पाहू शकशील का? माझा तिरस्कार नाही ना करणार? तुझं प्रेम थोर आहे. तू मला पदरात घे. घेशील?” संपतरायाने एखाद्या मुलाप्रमाणे विचारले.
“तुम्ही इतक्या वर्षांनी का होईना, परंतु मजजवळ सत्य सांगितलंत हा तुमचा मोठेपणाच आहे. नाही तर ही गोष्ट मला थोडीच कळली असती? असो. झालं ते झालं. तुम्ही व मी आता अलग नाही. पंधरा वर्षे एकत्र राहिलो. तुम्हांला मी कशी तुच्छ मानू? तुम्ही जणू माझे झाले आहात. तुमचा तिरस्कार करणं मी माझाच तिरस्कार करण्यासारखं आहे. जाऊ दे; जगात निर्दोष कोण आहे? पापाचा पश्चात्ताप झाला म्हणजे पुरे. परंतु हे जर मला पूर्वीच सांगितलं असतं तर ती सोनी मी आपल्या घरी आणली असती. आपण तिला वाढवलं असतं. आपण तिचं कोडकौतुक केलं असतं. आपल्या घरात तिनं आनंद पसरला असता. देवानं आपणांस मुलबाळ दिलं नाही. ते सुख आपणास नाही. ती उणीव भरून निघाली असती. मी तिला कुशीत घेतलं असतं. तिला जेवू घातलं असतं. तिला न्हाऊमाखू घातलं असतं. मातृसुखाचा आनंद मी लुटला असता. परंतु आता काय? असो. आपलं नशीब.” असं म्हणून इंदू थांबली.
“आपण मनूबाबाकडे जाऊ व सारं सांगू. सोनीला घेऊन येऊ. ती येईल. तिला सांगितलं की ती येईल.” संपतराय म्हणाला.
“जाऊ त्यांच्याकडे.” ती म्हणाली.
“आज रात्रीच जाऊ.” तो म्हणाला.