“सोन्ये, तू सारं ऐकतच आहेस. मी तुझ्या सुखाच्या आड कशाला येऊ? तुला गरिबीचा वारा लागावा असं मी कसं म्हणू? माझ्या स्वार्थासाठी मी तुला कशाला दु:खी करू? मी एकटा राहीन. एकटा होतो. एकटा राहीन. माझ्यासाठी तुला नकोत त्रास, तुला नकोत कष्ट. जातेस त्यांच्याकडे? माझी आडकाठी नाही. असं नको कुणी म्हणायला, की म्हातारा मनूबाबा सोनीच्या सुखाच्या आड आला. माझी सोनी कुठेही असो परंतु सुखात राहो. माझं काय? मी पिकलं पान झालो. आता केव्हा गळून जाईल त्याचा नेम नाही. जे दोन दिवस जगून या जगात काढायचे असतील ते एकटा राहून काढीन. सोन्ये, काय आहे तुझा विचार? तुला आता सारं समजतं. तू मोठी झाली आहेस. तू काय ते त्यांना सांग. ते उदारपणे बोलवीत आहेत. जातेस?” मनूबाबांनी विचारले.
“मी नाही जात. तुम्हांला सोडून कुठं मी जाऊ? ही झोपडी म्हणजेच माझा राजवाडा. इथं माझी सारी सुखं आहेत. या झोपडीत सार्या गोड आठवणी. झोपडीत आहे ते राजवाड्यात नाही. मला कामाचा कंटाळा नाही. रामू काम करतो. काम करणारा का कमी दर्जाचा? काम करतो तोच खरा मनुष्य. देवानं मला चांगले हातापाय दिले आहेत. ते का पुजून ठेवू? मला गडीमाणसं नकोत, दासदासी नकोत. सुंदर वस्त्र नकोत, दागदागिने नकोत. चार फुलं केसात घातली की पुरे. मला नको श्रीमंती. बाबा, तुमच्याजवळ मला राहू दे. तुम्ही माझं सारं सुख.” सोनी म्हणाली.
“आणि आम्ही नाही का कुणी तुझी? सोन्ये, ऐक. हे मनूबाबा तुझे मानलेले बाबा आहेत. परंतु तुझे बाबा तुझ्या समोर आहेत. मी तुझा पिता. तुझा जन्मदाता. पंधरा वर्षांपूर्वी तू या झोपडीत आलीस त्या वेळेसच मी तुला नेत होतो. परंतु नेता आलं नाही. आज पंधरा वर्षांनंतर पुन्हा तुला न्यायला आलो आहे. तुझ्या पित्याकडे तू नाही येणार? जन्म दात्याचं नाही ऐकणार?” संपतराय भावनावश होऊन बोलत होते.
खोलीत गंभीर शांतता पसरली होती. सोनीच्या डोळ्यांत पाणी आले. तिने आपले डोळे पुसले. आता ते डोळे निराळे दिसू लागले. त्या डोळ्यांत कठोरता आली. एक प्रकारचे सात्त्विक अशा संतापाचे तेज आले. तिने आपला ओठ थोडा चावला. ती जरा कुद्ध दिसू लागली. परंतु अद्याप वाणी बाहेर पडत नव्हती. संमिश्र भावनांचा सागर उसळला होता. इतक्यात इंदुमती शांतपणे म्हणाली, “सोन्ये, तू ऐक. पित्याचं ऐक. पित्याला सुख देण्यासाठी चल. आज इतकी वर्षं त्यांचा जीव कसा गुदमरला असेल ते ध्यानात आण. किती मानसिक दु:ख, मानसिक यातना त्यांनी भोगल्या असतील? तू त्यांची असून त्यांच्यापासून दूर होतीस. त्यांची सारी संपत्ती तुझी असून तुला फार तर मधूनमधून ते मदत देत. त्या वेळेस त्यांच्या मनाला किती दु:ख होत असेल! आपण सुखात आहोत, चांगले खातपीत आहोत, गाडीघोड्यांतून हिंडत आहोत, परंतु आपली मुलगी तिकडे गरिबीत आहे या विचाराने तुझ्या पित्याला काय वाटत असेल? झालं ते झालं. आता तरी तुझ्या पित्याकडे ये. त्यांच्या मनाला शांति-समाधान दे. मलाही तुझी आई होऊ दे. मला मूल ना बाळ. तू आमची, आता खरोखरची आमची हो. नाही म्हणू नको. आमचं मोठे घर तू आनंदानं भर. गाणे गायला शीक. पेटी वाजवायला शीक. एवढे मोठे घर, परंतु मुलाशिवाय ते ओस दिसते. तू ये, म्हणजे घरात प्रकाश येईल, संगीत येईल, एक प्रकारची मधुरता पसरेल. आमचा संसार सुखाचा व गोड होईल. सोन्ये, नाही म्हणू नको. आमचं ऐक. तुझ्या पित्याचं ऐक. जगात आईबाप म्हणजे थोर दैवतं. तुझा आई गेली. परंतु सुदैवाने पिता आहे. तो पिता तुझ्यासमोर बसला आहे. इतक्या वर्षांनी आपला पिता आपल्याला भेटला याचा तुला आनंद नाही होत? तुझं हृदय उचंबळत नाही? जगात पित्याचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं! मनूबाबांची तुझ्यावर सत्ता आहे, परंतु जन्मदात्या पित्याची अधिक आहे.”