मला इथं या झोपडीत सारं सुख आहे. या झोपडीतील उपासमारही तुमच्या श्रीमंतीतील मेजवान्यांपेक्षा गोड आहे. या झोपडीतील अणुरेणू प्रेममय आहे, कर्तव्यमय आहे. हा माझा स्वर्ग सोडून कुठं येऊं मी? इथेच मी राहीन. माझ्या मनुबाबांजवळ राहीन. तेच माझे खरे आईबाप. त्यांचाच माझ्यावर अधिकार. त्यांचीच माझ्यावर सारी सत्ता. त्यांना का म्हतारपणी सोडूं? मी का कृतघ्न होऊं! उद्या त्यांना काय वाटेल? मी गेल्ये तर त्यांना ही झोपडी खायला येईल. जर मी डोळ्याआड झाल्ये, तर भिरिभिरी हिंडतात व मला शोधतात. त्यांना काय वाटेल? त्यांना म्हातारपणी का रडवूं? त्याचे उरलेले थोडे दिवस, ते का दु:खात दवडायला लावू! आताच तर माझी त्यांना जरूरी, मीही आता मोठी झाल्ये आहे. आता मी स्वयंपाक करीन, त्यांना आवडतील ते पदार्थ करीन. आता मी केर काढीन, भांडी घाशीन, त्यांचे कपडे धुवीन. त्यांना कढत पाणी आंघोळीला देईन. आता मी यांचे अंथरूण घालीन. त्यांचे भक्तिप्रेमाने पाय चेपीन. एखादं चागलं पुस्तक रात्री त्यांना वाचून दाखवीन. त्यांचा हात धरून त्यांना फिरायला नेईन, त्यांना दोन सुवासिक फुले तोडून देईन. माझ्या बाबांचे उरलेले आयुष्य सुखात जावो. इथंच मी राहीन. माझ्या बाबांजवळ राहीन. कुठंसुद्धा जाणार नाही त्यांना सोडून.” असे म्हणून सोनीने मनूबाबांच्या गळ्याला मिठी मारली. म्हातार्याच्या डोळ्यांतून धारा लागल्या होत्या.
“सोन्ये, तुझं म्हणणं खरं आहे. राहा हो. इथंच राहा. तुझ्या पित्याला क्षमा कर. त्यांच्याविषयी फार कठोर भाव मनात नको बाळगू. आपण सारी मर्त्य माणसं. पदेपदी चुकणारी व घसरणारी. असो. सुखी राहा. कुठंही अस, पण सुखी राहा. आम्ही मधूनमधून काही पाठविले तर घेत जा. आम्हांला अगदी परकं नके समजू. हृदयात थोडीशी जागा तुझ्या पित्यासाठी ठेव. मनूबाबा, तुमचं उरलेलं आयुष्य सुखात जावो. राग नका धरू तुम्ही कुणी. क्षमा करा. येतो आम्ही. चला, उठा.” इंदुमती पतीचा हात धरून म्हणाली.
संपतराय उठला. पत्नीने त्याचा हात धरला होता. तिने दाराची कडी काढली. बाहेर गाडीत गाडीवान झोपी गेला होता. परंतु तो एकदम दाराचा आवाज ऐकून जागा झाला. त्याला लाज वाटली. तो एकदम उठून उभा राहिला. धनी व धनीण गाडीत बसली. मनूबाबा व सोनी दारात उभी होती. गाडी निघाली. चाबूक वाजला. घोड्यांचा टाप टाप आवाज रात्रीच्या शांत वेळी घुमत होता. “फिरून आल्या श्रीमंताच्या स्वार्या!” जागे असणारे म्हणाले. टापटाप आवाज आता दूर गेला. ऐकू येईनासा झाला. मनूबाबा व सोनी दोघे घरात आली. त्यांना दार लावले. सोनीने म्हातार्याच्या गळ्याला एकदम मिठी मारली. तिला अश्रू आवरत ना. आणि म्हातार्या मनूबाबांनाही पुन्हा जोराचा हुंदका आला. हळूहळू भावना ओसरल्या. बोलायला अवसर झाला.
“बाबा, तुम्हांला मी कधीही सोडणार नाही.”
“होय हो बाळ. तू गुणाची आहेस.”