मनूबाबांच्या झोपडीजवळ बाग तयार झाली. बागेला दगडांचे सुंदर कुसू घालण्यात आले होते. बागेत विहीर खणण्यात आली. तिला पाणीही भरपूर लागले. बागेची नीट आखणी करण्यात आली. फुलझाडे लावण्यात आली. लवकर फुलणार्‍या फुलझाडांचे ताटवे शोभू लागले. लतामंडपही करण्यात आले. त्यांच्याजवळ वेल सोडण्यात आले. बागेच्या मध्यभागी ती पवित्र जागा होती. तिच्याभोवती फुलझाडे लावण्यात आली होती. मध्ये ती हिरवी जागा शोभे. हळूहळू बागेला रंग येत होता.

रामूला ज्या वेळी इतर ठिकाणी काम नसे, त्या वेळेस तो बागेत काम करी. कधी कधी तो पहाटे उठे व बागेत येई. तेथे तासभर खपून मग दुसर्‍यांच्या कामावर जाई. एके दिवशी सोनी बाहेर झुंजूमुंजू आहे तोच बागेत आली. तेथे येऊन पाहते, तो रामू फुलझाडांना पाणी घालीत आहे!

“रामू, तू केव्हा आलास?”

“तुझ्या आधी आलो, सोनीची बाग सुंदर झाली पाहिजे.”

“ही बाग का फक्त सोनीची? ती रामूची नाही का?”

“दोघांची आहे.”

“रामू, माझ्यासाठी तू दमतोस. माझे मनोरथ पुरावे म्हणून सारखी खटपट करतोस. दिवसभर इतर ठिकाणी काम करून पुन्हा बागेत काम करायला येतोस.”

“इतर ठिकाणचा थकवा इथं मी विसरून जातो. इथं माझा सारा आराम, इथं माझा विसावा. येथील कामानं मी दमत नाही, उलट अधिक उत्साह येतो.”

“रामू, त्या जागेजवळ येतोस?”

“चल.”

दोघे त्या मध्यवर्ती जागेजवळ आली. सोनी हात जोडून उभी राहिली. रामूनेही हात जोडले. कोणी बोलले नाही. थोड्या वेळेने सोनी म्हणाली, “चला आता जाऊ.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel