'आणि माईजी, तुमचे आवडते गाणे राजकन्येने म्हटले.'
'खरे की काय? मला तिचा लळा होता.'
'जातो मी.'
'जा विश्रांती घे.'
विजयला मुक्ताची आठवण येई. तिच्याकडे जावे असे त्याला वाटे; परंतु तिच्या गावाचे नाव काय? खरेच. गावाचे नाव विचारायला आपण कसे विसरलो? वेडेच. तिचे नाव विचारले, परंतु तिच्या गावाचे नाव विचारले नाही. कोणते असेल बरे तिचे गाव?
विजय एक सुंदर चित्र तयार करीत होता. तो माईजींकडे जाई व ते चित्र रंगवीत बसे. अप्रतिम चित्र. कोणाचे होते चित्र? काय होते त्या चित्रात?
एके दिवशी ते चित्र पुरे करून विजयने आपल्या खोलीत लपवून ठेवले; परंतु मंजुळाताईने ते पाहिले.
एके दिवशी ते चित्र मंजुळा आईला दाखवीत होती.
'किती सुंदर चित्र!' आई म्हणाली.
'भगवान बुध्दांची ही यशोधरा असेल.' मंजुळा म्हणाली.
'होय. तिचेच असेल हे चित्र!' माता म्हणाली.
इतक्यात ग्रामाधिकारी तेथे आला.
'बाबा घरी नाहीत. काय आहे काम?' मंजुळाने विचारले.