‘चला तर मग. करा तयारी. वा-यावर बसून जाऊ.’

‘आगगाडीने जाऊ.’

‘खरेच! श्यामू, रामू, दामू वा-यावर पडतील. तीसुद्धा येणार ना? येईलच. ती येथे एकटी थोडीच राहाणार? चला लवकर चला म्हणजे झाले.’

सर्व मंडळी ठाण्याला आली. त्या दत्तमंदीराच्या आवारात आली. तेथील मोफत दवाखान्याचे डॉक्टर भले गृहस्थ होते. त्यांची व वेड्यांच्या दवाखान्यातील ओळख होती. त्यांनी बळवंतरावांस मोटारीतून तिकडे नेले. बरोबर भोजू व सीताबाई होत्या.

बळवंतरावांना दवाखान्यात ठेवण्यात आले. सीताबाई व भोजू परत घरी आली. हळूहळू सारी व्यवस्था लागली. सीताबाई दत्तासमोर सारख्या बसत व प्रार्थना करीत. भोजू सर्वांना धीर देत होता.

‘बरे होईल का हो वेड?’ सीताबाईस आशेने मंदीरातील डॉक्टरांना विचारीत.

‘होईल हो बरे. तुमची चित्रा सापडली, तर एका क्षणात वेड जाईल.’ ते म्हणाले.

‘कोठे गेली चित्रा?’ सीताबाई रडू लागल्या.

‘सापडतील. दत्तराजाच्या कृपा होईल.’ डॉक्टरांनी धीर दिला.

‘तुमच्यासारखी चांगली माणसे भेटली ही देवाचीच दया. हा भोजूच पाहा.’ देवानेच जणू तो आम्हाला दिला. देव दयाळू आहे. तो आणखी थोडी दया नाही का दाखवणार? दाखवतील. दत्तगुरू सारे चांगले करतील.’ असे सीताबाईस आशेने परंतु स्फुंदत म्हणाल्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel