चित्राला घेऊन आमदार हसन मुंबईस आले ते आपल्या ओळखीच्या एका हिंदू आमदाराकडे गेले. गोविंदराव त्यांचे नाव. ‘गोविंदराव, ही घ्या तुमची धर्मभगिनी. हिच्या आईबापांचा मी शोध लावीपर्यंत ही तुमच्याकडे असू दे.’ आमदार हसन म्हणाले.
‘हसनसाहेब, हिंदूनी मुसलमानांस नावे ठेवली म्हणजे मुसलमान रागावतात; परंतु हे पाहिलेत ना प्रकार?’ गोविंदराव जरा खोचून म्हणाले.
‘परंतु गोविंदराव, चित्राला एक मुसलमान तुमच्याकडे आणून पोचवीत आहे. एका मुसलमान मुलीनेच तिला वाचवले. एका मुसलमान मोलकरणीने तिचे रक्षण केले. या गोष्टी का विसरता?’ आमदार हसन म्हणाले.
‘मुसलमानांचा काय दोष?’ माझ्या सासूनेच जर गुंड बोलावून त्यांच्या हवाली मला केले, तर त्या गुंडाना तरी कशी नावे ठेवावी? तेही पोटासाठी करतात. बायका-मुली पळवून बड्याबड्या नवाबांना व श्रीमंतांना विकतात. असो. देवाने हिंदूंच्या हाती मला आणून दिले आहे.’
‘गोविंदराव, मी जातो. हिचे वडील मामलेदार होते.’
‘मामलेदार? काय नाव?’
‘बळवंतराव.’ चित्राने सांगितले.
‘अहो, वेड लागलेले बळवंतराव मामलेदार की काय?’
‘वेड लागले?’ चित्राने भिऊन धस्स होऊन विचारले.
‘अहो, येथे ठाण्याला एक वेड्यांचे हॉस्पिटल आहे. त्यात एक वेडा बळवंतराव आहे. ठाण्याला माझे एक मित्र आहेत, ते सांगतात मजा. मामलेदारच होते ते. वेडात कलेक्टरला सारखे शिव्या देतात.’
‘गोविंदराव, मी ठाण्यास जाऊन येतो. मी फातमास शब्द दिला आहे की, तुझ्या मैत्रिणीची सर्व व्यवस्था केल्याशिवाय मी राहाणार नाही. जातो मी. माहिती मिळताच येईन.’