कृष्णाचे चरित्र अनंत आहे, अपार आहे. तो परमात्माच मानला आहे. जसे पहावे तसे त्याचे रूप आहे. जे पाहाल ते त्याच्यात आहे. श्रीकृष्णाकडे अनेकांनी अनेक रीतींनी आजपावेतो पाहिले आहे व पुढेही पाहतील. प्रत्येकाचे पाहणे यथार्थ आहे. जो तो आपल्या अनुभवाच्या उंचीवर उभा राहून आपल्या श्रध्देच्या डोळयांनी त्याच्याकडे पाहील व त्याला त्याला ते दर्शन सत्यरूपच आहे. श्रीमत् शंकराचार्यांनी कृष्णाकडे पाहिले; ज्ञानेश्वरांनी पाहिले; लोकमान्य टिळकांनी पाहिले; अरविंदांनी पाहिले; महात्माजींनी पाहिले. प्रत्येकाला श्रीकृष्णाची मूर्ती नवनवीनच दिसली. श्रीकृष्ण खरोखर सुंदर आहे. ज्याचे रूप क्षणाक्षणास नवीन दिसते, अभिनव दिसते तोच खरा सुंदर.
क्षणे क्षणे यन्नवतामुपैति ।
तदेव रूपं रमणीयतायाः ॥
कृष्णाच्या चरित्राची रमणीयता ही अशी आहे.
विश्वरूप श्रीकृष्ण
मी कृष्णचरित्रासंबंधी काही वाचले आहे, काही ऐकले आहे. कधी कधी मनात थोडाफार माझ्या शक्तीप्रमाणे, विचार करतो, निरनिराळे कृष्ण माझ्या डोळयांसमोर उभे राहतात. कोणी मोह पाडतात, कोणी गंभीर करतात, कोणी भिववितात; कोणी हसवितात, कोणी रडवतात; सद्गदित करतात. मोराच्या पिसांचा मुकुट घालणारा, बासरी वाजवणारा, सर्वांना मोहून टाकणारा, गोपाळबाळांबरोबर खेळणारा, मातलेल्या असुरांचा बालपणीच समाचार घेणारा-कंस आणि शिशुपाल यांचा वध करणारा, गुरे राखणारा, कालियामर्दन करणारा-कौरवपांडवांचे सख्य व्हावे म्हणून धडपडणारा, अर्जुनाचे घोडे हाकणारा, गीतेचा उद्गाता-एक ना दोन हजारो प्रसंग डोळयांसमोर येतात व मन भांबावते-घाबरते. असा हा विश्वरूप कृष्ण माझ्यासारख्याला कसा पचणार? विदुराच्या कण्या खाणारा, राजसूर्य यज्ञाच्या वेळेस उष्टी काढणारा, पार्थाचे घोडे हाकणारा, गायी चारणारा, लोणी लुटणारा हा श्रीकृष्ण मला समजतो. परंतु शिखंडीस पुढे करून भीष्मास मारवणारा, 'नरो वा कुंजरो वा' असे म्हणायला लावून धर्माला असत्यवादी करून द्रोणाचार्यास मारवणारा, गदायुध्दाचा नियम भीमाला मोडायला लावून दुर्योधनाची मांडी मोडवणारा असा हा श्रीकृष्ण मी पचवू शकत नाही. परमेश्वराचे वर्णन करताना 'शान्ताकार भुजगशयनं' असे केले आहे. सर्पावर निजलेले असून पुन्हा शांत असा भगवान आहे. अशी जी प्रखर कर्मे त्यांच्यावर निजणारा हा श्रीकृष्ण पुन्हा शांत, गंभीर, अविचल आहे ! हा श्रीकृष्ण मला भिववतो, मला दिपवितो. श्रीकृष्णाकडे पाहावयास मी असमर्थ आहे. मी हात जोडून म्हणतो, 'तू परमात्मा आहेस, सर्व रचणारा तू, सर्व पाडणारा तू, देवा, तुला सारे साजूनच दिसते.'