तरुणांचा पुढारी
हा लहानगा श्रीकृष्ण तरुणांचा पुढारी झाला. सर्व तरुणांना बलवान, कसरत करणारे, चपळ, तेजस्वी, बंधुभावाने भरलेले असे त्याने बनवले. त्यांचा पाठिंबा मिळवून तो गावातील जुन्या रूढी मोडू लागला. कृष्णाचे सांगणे ऐकायला सर्व तरुण एका पायावर तयार असत. त्यामुळे म्हाता-यांचे काही चालेना. इंद्र पर्जन्य पाठवतो. त्याच्यासाठी मोठा यज्ञ वगैरे गोकुळात करण्यात येत असे, श्रीकृष्णाने या यज्ञाला चाट दिली. हे यज्ञ कशाला? यात अर्थ नाही, असे तो म्हणे. तुम्हाला कोणाची पूजाच करावयाची असेल, तर या गोवर्धन पर्वताची करा. या पर्वतातून झरे वाहतात. याच्यावर आपल्या गाई चरतात. हा गाईंना वाढवणारा पर्वत आहे. यालाच प्रदक्षिणा घाला, असे श्रीकृष्ण सांगू लागला. यज्ञाची ही नवीन कल्पना बाळपणीच त्याच्या हृदयात उद्भूत झाली. आपल्या रोजच्या सेवेची साधने, रोजच्या कर्माची साधने, तीच पवित्र आहेत. त्यांचीच पूजा करू. त्यांचीच झीज भरून काढू. त्यांना स्वच्छ ठेवू. हाच यज्ञ. असे हा लहानगा कृष्ण सांगू लागला व सारे गोपाळ त्याच्या पाठोपाठ गेले. यज्ञात हविर्भाग खाणारे इंद्र; वरुण यांना त्याने दूर केले. ही एक मोठीच गोष्ट त्याने केली. त्याबरोबरच गोकुळच्या आजूबाजूला गोकुळच्या वाढीस विरोध करणारे जे होते त्यांना त्याने वठणीवर आणणे सुरू केले. कालिया हा एक यमुनेच्या तीरावर गोकुळाजवळच वसाहत वसवणारा कोणी नाग-जातीचा पुरुष असेल. गोकुळातील पोरांच्या गायी तो चारावयास येऊ देईना. तो मुलांना मारी. त्यांच्या गायी मारी. त्याचा त्रास होऊ लागला. आपले बळ वाढेपर्यंत कृष्ण थांबला होता, परंतु या कालियाला दूर करण्याचे त्याने निश्चित केले. एक दिवस धैर्याने त्याच्या घरात शिरून, त्याला पाडून त्याच्या शिरावर पाय ठेवून तो बालमल्ल उभा राहिला. शेवटी त्याच्या स्त्रिया अनुनय करू लागल्या तेव्हा त्याने त्या कालियाला जीवदान दिले व सांगितले, तू येथून जा. या मध्य देशातून दूर समुद्रकाठी जा. तिकडे वसाहत कर. राज्य कर. तेथे तुला कोणाचा त्रास होणार नाही.
गोकुळातील प्रेमाचा, ऐक्याचा, शांतीचा भंग करणारे असे हे असुर त्याने दूर केले व गोकुळ आनंदवनभुवन केले, अशा या कृष्णाकडे पाहिले म्हणजे तो मला मोठा क्रांतिकारक दिसतो, तो समाजवादी दिसतो. समानतेचा झेंडा हातात घेणारा दिसतो.
सांदीपनी गुरुजींकडे
कृष्णाने स्वतःच्या मातापित्यांस बंदीत घालणा-या, उग्रसेनचे राज्य हिरावून घेणा-या जुलमी कंसाचा वध केला. आई-बापांस मुक्त केले व तो सांदीपनींकडे अध्ययनार्थ गेला. त्याचे खरे शिक्षण झालेच होते. लहानपणापासून जी कामगिरी त्याने केली, जे प्रयोग केले त्यांतून एक प्रकारचे ज्ञान, एक प्रकारची विचाराची दिशा त्याची स्थिर होतच होती. परंतु या सर्वांची नीट सुसंगती लावण्यासाठी तो नवचक्षू देणा-या गुरूंकडे गेला. आपल्या विचारांना परिपूर्णता आणण्यासाठी, झिलई आणण्यासाठी तो गेला. शिष्टसंमत आचार अंगी असावा, सभ्यता जगाची समजावी, जगातील दुसरे विचारप्रवाह समजावेत म्हणून तो गेला. तेथेही सर्वांची हृदये त्याने वश केली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यादिकांची हृदये आपलीशी केली. तेथेही सुदाम्यासारखी जी अशक्त मुले त्यांचा तो मित्र झाला व त्यांना तो कधी विसरला नाही. अनेक राजे-महाराजे पुढे श्रीकृष्णाने सिंहासनावरून खाली ओढले व नवीन बसविले. पण स्वतः राज्यपद कधी घेतले नाही. परंतु सुखा सुदामा ! त्याला सुदामपुरी-एक नगरी दिली. तिथला त्याला राजा केले ! श्रीकृष्णाला एकच सिंहासन पाहिजे होते. आर्तांच्या, पतितांच्या हृदयांतील सिंहासन सकल दीन जनतेच्या हृदयांतील तो अनभिषिक्त राजा होता व हेच त्याचे खरे भाग्य होते.