“आई, हा गांधी आला आहे बघ.”
“कोण रे बाबा तू ?”
“मी सेवादलातला मुलगा. आम्ही खेड्यातून पाळीपाळीनं औषध वगैरे घेऊन हिंडायचं ठरवलं आहे. काय होतंय मुलीला ?”
“ताप, भारी ताप ! आणि डॉक्टर कोठून आणू ? आज पोराचे पैसे आले होते. म्हटलं की डॉक्टर आणीन सोनगावचा. परंतु पैसे मिळाले नाहीत.”
“का नाही मिळाले ?”
“सही करता येत नाही. साक्षीला माणूस भेटेना. गावात शाळा नाही. मास्तराची साक्ष घेई. हा नवा माणूस. पैसे येऊनही मिळाले नाहीत.”
“आई. मी डॉक्टर घेऊन येईन. बरी होईल मुलगी. परंतु तुम्ही सर्वांनी शिकलं पाहिजे.”
“कधी शिकायचं दादा ?”
“रात्री घटकाभर. मी येथे रात्रीची शाळा काढीन. तुम्ही याल ?”
“मी येईन, माझी पोरं येतील. आम्ही सारी शिकू. माझ्या पोराला मग मी कागद लिहीन. तोही मुंबईला शिकतो आहे. पैसे येऊन मिळाले नाहीत ! शिक्षण नाही म्हणजे सारं फुकट!”
रमेश दुसर्या दिवशी डॉक्टरांना घेऊन आला. औषध मिळू लागले. बाबी बरी झाली. रमेश त्या गावीच येऊन राहिला. लहानसा गाव. त्याने तेथे शाळा काढली. सायंकाळी मुलांना शिकवी. रात्री मोठ्यांना. एके दिवशी पुरुष मंडळी येत; एके दिवशी आय़ाबाया. बाबी आणि तिची आई सगळ्या बायकांना बोलवायच्या. गावात सेवादल आले; स्वच्छता आली; साक्षरता आली. छोटे उद्योग येऊ लागले. रमेशला सारे दुवा देत. सेवादलाला दुवा देत. परंतु रमेश म्हणायचाः “बाबीच्या आईला सारं श्रेय ! ती म्हातारी शिकायला उभी राहिली. तिच्यामुळं गाव तयार झाला. शिकल्यावाचून गती नाही, म्हातारीला पटलं. ज्ञान म्हणजे भगवान ! लिहिणंवाचणं हवं. नाही तर पदोपदी अडतं. लिहिता-वाचता येणं म्हणजे आजकाल मोठा आधार असतो.” असे म्हणून रमेश गाऊ लागे व मुलेही म्हणू लागत-
शिकू शिकू
शिकू शिकू
स्पर्धेमाजी आम्हि टिकू।।
जो न शिके
जो न शिके
आनंदा तो मूर्ख मुके।।
शिका शिका
शिका शिका़
संसारी मिळवाल सुखा।।
गाणी गात मुले नाचू लागत.