८
महात्माजी आफ्रिकेतील सत्याग्रह यशस्वी करून हिंदुस्थानात परत आले होते. त्यांचे गुरु नामदार गोखले यांनी सांगितल्याप्रमाणे ते हिंदुस्थानभर हिंडून येत होते. संयुक्त प्रांतांत असताना त्यांना काही बिहारची मंडळी भेटली. बिहारमधील चंपारण्यात गो-या मळेवाल्यांनी अपरंपार जुलूम चालविला होता. आलेले बिहारी शिष्टमंडळ म्हणाले : ‘गांधीजी, तुम्ही यातून मार्ग दाखवा.’
‘मी अवश्य येईन. परंतु तुम्ही माझ्या सांगीप्रमाणं वागलं पाहिजे.’ गांधीजी म्हणाले.
‘सांगाल तसं वागू’ ते म्हणाले
‘तुरुंगात जायची तयारी ठेवाल?’
‘हो.’
त्याप्रमाणे ठरले आणि पुढे काही दिवसांनी चंपारण्याच्या सत्याग्रहाला ते धावून आले. राजेंद्रबाबू वगैरे बिहारमधील सत्याग्रही मंडळी याच वेळेस प्रथम गांधीजींना मिळाली. शेतक-यांमध्ये काम तर सुरू झाले. परंतु गांधीजींना सर्व जनतेत चैतन्य उत्पन्न करावयाचे होते. ते बरोबरच्या काही स्वयंसेवकांस म्हणाले : ‘तुम्ही खेड्यापाड्यांतून शेतकरी मुलांच्या शाळा सुरू करा.’ कस्तुरबाही चंपारण्यात आलेल्या होत्या. गांधीजी एके दिवशी त्यांना म्हणाले : ‘तू का नाही शाळा सुरू करीत? शेतक-यांच्या मुलांत जा व त्यांना शिकव.’
‘मी काय शिकवणार? त्यांना का मी गुजराती शिकवू? मला बिहारी हिंदीही अजून नीटसं येत नाही’ कस्तुरबा म्हणाल्या.’
‘अग, मुलांचं पहिलं शिक्षण म्हणजे स्वच्छता. शेतक-यांची मुल गोळा कर. त्याचे दात बघ. त्यांचे डोळे बघ. त्यांना आंघोळ घाल. अशा रीतीने त्यांना स्वच्छतेचे पहिले धडे तरी देशील? आईला हे करणं काही कठीण नाही आणि असं करताना त्यांच्याजवळ तू बोलशील, ती मुलं तुझ्याजवळ बोलतील. तुला त्यांची भाषा समजू लागेलन मग त्यांना पुढे ज्ञानही देऊ शकशील. परंतु स्वच्छतेचं ज्ञान उद्यापासूनच त्यांना नेऊन दे.
आणि कस्तुरबा दुस-या दिवसापासून तसे करू लागल्या. बालगोपालांच्या सेवेचा अपार आनंद लुटू लागल्या.
गांधीजी स्वच्छता म्हणजे ज्ञानाचा आरंभ, असे समजत.