२१
महापुरुषांची शक्ती आश्चर्यकारक असते. त्यांच्या हास्यात, त्यांच्या अश्रूंत, त्यांच्या गोड वाणीत अपार शक्ती असते. प्रांजळपणा त्यांच्या पराक्रमात असतो. स्वामी रामतीर्थांचे मंदस्मित अपार परिणामकारक असे, म्हणून सांगतात. एकदा एक बुद्धीवादी गृहस्थ रामतीर्थांकडे वादविवादासाठी म्हणून गेला. परंतु रामतीर्थांचे मधुर हास्य पाहून, वाद करणे विसरून प्रणाम करून तो निघून गेला. महात्माजींच्या जवळही अशी जादू होती.
एकदा राष्ट्रसभेच्या कार्यकारणीची बैठक होती. देशबंधू दास कार्यकारणीचे सभासद होते. ते एका मित्राजवळ म्हणाले, ‘आज महात्माजींजवळ मी चांगलीच चर्चा करणार आहे. सारे मुद्दे काढून ठेवले आहेत. बघू या गांधीजी काय उत्तर देतात.’ कार्यकारणीची बैठक सुरू झाली. महात्माजी हसतमुख असे आले. सर्वांना अभिवादन केले. कामास आरंभ झाला. महात्माजींनी आपले निवेदन मांडले. अत्यंत निर्मळपणे, प्रामाणिकपणे मांडलेले ते निवेदन ऐकून सारे जिंकले गेले.
‘कोणाला काही शंका आहे?’ बापूजींनी विचारले.
‘सारे नि:शंक आहोत.’ सभासद म्हणाले.
‘ठीक तर मग. मी जातो.’ असे म्हणून गांधीजी सर्वांना प्रणाम करून हास्यमुखाने निघून गेले.
‘तुम्ही गांधीजींजवळ चर्चा करणार होता ना? मग गप्प का बसलात?’ देशबंधूंना कोणी विचारले.
‘मी काय सांगू! नेहमी असंच होतं. सारे ठरवून यावं, परंतु गांधीजींच्या प्रत्येक शब्दातील कळकळ जिंकून घेते. आमचा बुद्धिवाद हतप्रभ ठरतो, निर्जीव ठरतो. शेवटी चर्चाप्रिय बुद्धीला हृदय जिंकून घेतं.’ देशबंधू म्हणाले.