२५
मीराबेन आज हिमालयाच्या उतरणीवर एका खेड्यात गोशाळा चालवीत आहेत. गाई-बैलांच्या शेणमुताचा शेतीसाठी नीट उपयोग करीत आहेत. एका आरमारी अधिका-याच्या त्या कन्या. हिंदी जनतेच्या सेवेला वाहून घेण्याचे ठरवून त्या भारतात आल्या. महात्माजींच्या जीवनतत्त्वज्ञानाच्या त्या निस्सीम उपासक बनल्या. त्या साधक वृत्तीच्या आहेत. विवेकानंदांच्या जशा भगिनी निवेदिता, त्याप्रमाणे महात्मा गांधींच्या मीराबेन.
सेवाग्रामला आल्यावर मीराबेन जणू भिक्षुणी बनल्या. व्रतस्थ बनल्या. त्या आजूबाजूच्या पंचक्रेशीत औषधे घेऊन हिंडत. सेवा त्यांचा धर्म बनला. मीराबेन चांगल्या शिकलेल्या आहेत. त्यांना फ्रेंच चांगले येते. महात्माजींचे चिटणीस महादेवभाई, त्यांना फ्रेंच शिकायची इच्छा होती. मीराबेनजवळ थोडा वेळ काढून ते फ्रेंच शिकू लागले. परंतु पुढे ती गोष्ट महात्माजींना कळली. एके दिवशी बापू नि महादेवभाई दोघे बसले होते. बोलता बोलता महात्माजी म्हणाले,
‘महादेव, हल्ली तू म्हणे फ्रेंच शिकतो आहेस? कोण शिकवतं?’
‘मीराबेन शिकवतात.’
‘शिकायला वेळ कोठून काढलास तू? माझ्या कामात अळंटळं करीत असशील. आणि हे बघ मीराबेन स्वदेश, स्वगृह सोडून या देशात आली. तिला तू हिंदी शिकव. तिच्यापासून घेण्याऐवजी तिला नवीन काही दे. खरं ना?’
‘होय बापू.’ महादेवभाई म्हणाले.