३८
गांधीजी तिस-या वर्गानेच नेहमी प्रवास करीत. गरिबांच्या जीवनाशी ते एकरूप झालेले. त्यांना या वर्गाने जाताना अनेक अनुभवी येत. गांधीजींची नम्रता, निरहंकारिता अशा वेळेस सुंदर रीतीने प्रकट होई.
एकदा बापूजी तिस-या वर्गाने असेच जात होते. एका स्टेशनावर खूप गर्दी होती. गांधीजी या गाडीने जात आहेत, अशी वार्ता तेथे नव्हती. नाही तर दर्शन घ्यायला हजारो लोक आले असते. ‘महात्मा गांधी की जय’ या जयघोषाने सारा भाग दुमदुमून गेला असता. परंतु आज तसे जयघोष नव्हते. गाडी स्टेशनावर फार थोडा वेळ थांबणार होती. ते पहा एक गृहस्थ. त्यांचे सामान किती! कोणी शेठजी आहेत का काय? स्वत: आत जाण्याआधी ते सामानाला आधी आत टाकत होते. गाडी सुटली. हमलाचा हमालीसाठी तगादा. शेठजीला कसाबसा आत लोटला. पडता पडता शेठजी वाचले, ते आत सामानावर बसले, जीवात जीव आल्यावर त्यांनी सामान जरा नीट लावले.
पुढचे मोठे स्टेशन आले. तेथे हजारो लोक बापूजींच्या दर्शनार्थ जमलेले. जयघोषांनी दशदिशा भरल्या. महात्माजींनी सर्वांना दर्शन दिले. ‘हरिजन के वास्ते’ म्हणून हात पुढे केला. लोकांनी जवळ होते ते दिले. पुन्हा गाडी सुरू झाली. महादेवभाई व इतर पैसे मोजू लागले.
शेठजींच्या लक्षात आले की, महात्माजी ज्या डब्यात आहेत त्या डब्यात आपण चढलो आणि म्हणूनच पडता पडता वाचलो. महात्माजींची कृपा. त्या शेठजींचे अंत:करण कृतज्ञतेने भरून आले. ते हळूच उठले. भीतभीत गांधीजींच्याजवळ गेले. थरथरत उभे राहिले. त्यांनी गांधीजींचे पाय धरले.
‘हे काय? काय झालं! काय हवं?’ गांधीजींनी विचारले.
‘महाराज, आपण या डब्यात होतात. मला माहीतही नव्हतं. मी मागच्या स्टेशनवर चढताना पडत होतो. परंतु वाचलो, आपली कृपा.’
‘मी या डब्यात होतो म्हणून तुम्ही पडत होतात; वाचलेत ईश्वराच्या कृपेने.’ महात्माजी गंभीरपणे म्हणाले.