४४
गांधीजी जी व्रते घेत, ती काहीही झाले तरी सोडीत नसत. आपल्या परिवारातील मंडळींनाही अशाच प्रकारची शिकवण त्यांनी दिली होती. गांधीजींनी अनेक व्रतांचा स्वीकार केला होता. परंतु सूतकताईच्या व्रतावर त्यांचे विशेष प्रेम होते. कितीही काम असो, बड्या मंडळींच्या गाठीभेटी असोत, काँग्रेसच्या सभा असोत, चर्चा असो, तो रोज काही ठराविक वेळ सूत कातल्याशिवाय राहत नसत. हेच व्रत आश्रमातील अनेक व्यक्तीही पाळत असत.
एकदा गांधीजी प्रवासाला निघाले होते. बराच लांबचा प्रवास होता. बरोबर इतर मंडळीसुद्धा होती. वेळ सापडताच गांधीजींनी आपली चरख्याची पेटी उघडली. तो काय, आत कापसाचे पेळू नाहीत. गांधीजी पेळू घेण्यासच विसरले होते. त्यांनी महादेवभाईंना हाक मारली व ते म्हणाले : ‘अरे महादेव, मी सेवाग्रामहून निघताना पेळू घ्यायला विसरलो रे. तुझ्यातले थोडेसे देशील का?’
महादेवभाई बराच वेळ काही बोलत ना. गांधीजी पुन्हा म्हणाले : ‘देतोस ना महादेव? तेव्हा महादेवभाई म्हणाले : बापू, मी रोज सूत काततोय पण आज चरखा घ्यायला विसरलो मी.’ महादेवभाई मान खाली घालून उभे होते. बापूंच्या डोळ्याला डोळा देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. नंतर गांधीजींनी दुस-या एका व्यक्तीजवळ पेळू मागितले. पण तिच्याकडून तोच जबाब आला.
गांधीजी गंभीर झाले. अंतर्मुख झाले, कसल्या तरी गंभीर विचारात मग्न झाले. लागलीच त्यांनी पुढील ‘हरिजन’मध्ये एक लेख प्रसिद्ध केला. लेखात त्यांनी लिहिले होते : ‘मिठानेच आपला खारटपणा सोडून दिला तर त्याचा अळणीपणा घालवायचा कोणी?’ – खरेच. ज्या व्यक्तींनी सूतकताईचा प्रसार करावयाचा, त्यांनीच आपल्या व्रताकडे दुर्लक्ष केले, तर त्यांना व्रतपालन शिकवायचे कोणी?
सामान्य व्यक्तींत आपल्या हातून झालेल्या चुका ताबडतोब जगासमोर उघड रातीने मांडीत. आत्मशुद्धीचा तो एक प्रकार आहे असे ते मानीत असत.
ते आपल्या एका लेखात म्हणाले होते : ‘आपली चूक कबूल करण्यात जर माणसाला शरम वाटत असेल, तर ती चूक मुळात करण्यातच त्याला शतपट शरम वाटली पाहिजे.’